(मुंबई)
राज्यात अनेक भागात आत्तापासूनच पाणीटंचाई जाणवत असल्याने गावे आणि वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. कुठे शासकीय तर कुठे खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यातील ७० गावे आणि २०४ वाड्यांवर ७५ टँकरद्वारे सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात ७ शासकीय तर ६८ खाजगी टँकरचा समावेश आहे. ज्यात सर्वाधिक टँकरद्वारे ठाणे आणि पालघर जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जात आहे.
राज्यात उन्हाचा चटका वाढतो आहे. त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे. त्यातच पाण्याची पाणीपातळी घसरत आहे. बोअरवेल आणि विहिरीतील पाणी देखील कमी होत आहे. त्यामुळे या एप्रिल महिन्यातच अनेक भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात याचे सर्वाधिक परिणाम जाणवत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत आता पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली आहे. पंचायत समितीकडे अनेक प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे मागणी करणा-या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील गावे आणि वाड्यांवर ७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात
सर्वाधिक २२ टँकरद्वारे ठाणे आणि पालघर जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी २२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वधिक पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. तर मराठवाड्यात सध्या एकही टँकर सुरू नाही.