(मुंबई)
राज्यभरात गोवर धोका वाढताना दिसत आहे. भिवंडीपाठोपाठ आता ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा, वसई विरार महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महापालिका या क्षेत्रातही गोवरचा उद्रेक झाला आहे.
राज्यात आतापर्यंत 658 गोवरचे रुग्ण सापडले असून, संशयित रुग्णांची संख्या 10 हजार 234 इतकी आहे. तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरांमध्ये गोवरचे 44 रुग्ण आढळले असून 303 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावर या विषयातील तज्ञांची बैठक झाली.
उद्रेक प्रतिसाद लसीकरण अंतर्गत ज्या भागांमध्ये गोवरची उद्रेकजन्य परिस्थिती आहे, त्या भागामध्ये नियमित लसीकरणाच्या नेहमीच्या डोस व्यतिरिक्त नऊ महिने ते पाच वर्षे या वयोगटातील मुलांना गोवर आणि रूबेला लसीची एक अधिकची मात्रा देण्यात यावी, अशी सूचना देण्यात आल्या आहेत.