राज्यात अॅम्ब्युलन्सचा महाघोटाळा झाला असून ४ हजार कोटींचे टेंडर तब्बल ८ हजार कोटींना काढण्यात आले, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. यामध्ये आरोग्य खात्यातील एका बड्या मंत्र्यांचा हात असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यांच्या या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली असून नेमका तो मंत्री आहे तरी कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे. विजय वडेट्टीवार यांनी आज पुण्यात माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात अॅम्ब्युलन्सचा महाघोटाळा झाल्याचा आरोप केला. वडेट्टीवार म्हणाले, ‘राज्यात सुरू असलेल्या १०८ अॅम्ब्युलन्सचा तब्बल १० वर्षांसाठी ८ हजार कोटींचे टेंडर काढण्यात आले. खरंतर कुठलेही टेंडर ३ वर्षांच्या पलिकडे नसते.’
‘या टेंडरची कुठल्याही पद्धतीने तपासणी केली, तरी हे काम ४ हजार कोटींच्या वर जाऊ शकत नाही. परंतु, आरोग्य विभागाच्या मंत्र्याने हे टेंडर तब्बल ८ हजार कोटींना काढले. यासाठी एका आयएएस अधिका-याला बदलीचा धाक दाखवून त्याकडून ७ दिवसांत हे काम करून घेण्यात आले. अॅम्ब्युलन्सचे हे टेंडर आरोग्यमंत्र्यांनी मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्याचे काम केले. या टेंडरमधून त्यांना ४ हजार कोटी रुपये कमवायचे आहेत. यातून जनतेच्या पैशाची लूट सुरू होणार. राज्य सरकारच्या तिजोरीवर भर पडणार. सध्या संपूर्ण आरोग्य खातेच भ्रष्टाचारात बुडाले आहे’, असा घणाघातही वडेट्टीवार यांनी केला आहे.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘४ हजार कोटींच्या कामाला ८ हजार कोटी रुपये मोजणे आणि स्वत:च्या जवळच्या नातेवाईकांना देणे, यामध्ये मंत्र्यांची पार्टनरशिप आहे, त्यामुळे हे राज्य अधोगतीकडे चालले आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार असून संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.’