(मुंबई)
राज्य सरकारकडून पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरात 9 आणि 10 डिसेंबर रोजी या महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याचा मोठा लाभ तरुणांना होणार आहे.
या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध कंपन्यांकडून आपल्या रिक्त पदांसाठी उमेदवारांची मागणी नोंदविण्यात आली. या महारोजगार मेळाव्यात जवळपास 300 कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्या मार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून या महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 9 डिसेंबर आणि 10 डिसेंबर या दोन दिवशी हा महारोजगार मेळावा होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा मेळावा सुरू राहणार आहे. नागपुरातील जमनलाल बजाज प्रशासकीय भवन, नागपूर विद्यापीठ, अमरावती रोड नागपूर येथे हा महारोजगार मेळावा होणार आहे. अधिकाधिक तरुणांनी या मेळाव्यात सहभागी होऊन नोकरीची संधी मिळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या महारोजगार मेळाव्यात 300 हून अधिक कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट कंपन्या सहभागी होणार आहेत. या महारोजगाराच्या माध्यमातून राज्यातील किमान 21,000 तरुणांना नोकरी उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा महारोजगार मेळावा राज्यातील सर्वात मोठा मेळावा असणार आहे. हा मेळावा आयोजित करण्यासाठी राज्य सरकारकडून 5 कोटी रुपयांच्या खर्चाला यापूर्वीच मान्यता दिली होती.
राज्य सरकारकडून https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. नोकरीइच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2023 पर्यंत 290 ऑनलाईन आणि ऑफलाईन विविध मेळावे घेण्यात आले असून यामध्ये 1 लाख 40 हजार 110 युवक आणि युवतींना रोजगार प्राप्त झाला आहे. आतापर्यंत विभागीय रोजगार मेळाव्यासाठी 1 लाख रुपये, तर जिल्हास्तरावरील रोजगार मेळाव्यासाठी 40 ते 60 हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा होती. सन 2023 पासून मेळावे अधिक प्रभावीरित्या राबविण्यासाठी 5 लाख रूपयांची मर्यादा वाढविण्यात आली आहे.