देवरूख : (सुरेश सप्रे) देवरूख नजीकच्या साडवली येथे आयोजित राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत कोसुंब मधील समीर बनेंच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा शिवजयंती निमित्ताने माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांच्या पुढाकारने व मार्गदर्शनाखाली पार पडली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी व शासकीय परवानगी घेवून युवा कार्यकर्ते प्रद्युम्न माने, सुदिप बने व मित्रमंडळ, साडवली सरपंच राजेश जाधव व संगमेश्वर तालुका बैलगाडी मालक संघटना यांच्या संयोजनाखाली साडवली व ओझरे सिमेवर कै. मीनाताई ठाकरे हायस्कूलच्या पाठीमागील धुळीच्या माळावर शनिवारी राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेचा थरार रंगला. यास्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री रविंद्र माने, जेष्ठ उद्योजक अण्णा सामंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सौ. नेहा माने जि. प. सदस्य रोहन बने आधी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेत राज्यातील ७४ बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. बंदी उठल्यावर जिल्हात प्रथमच एवढी मोठी बैलगाडी स्पर्धा होत असल्याने पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती.
या राज्यस्तरीय स्पर्धेत कोसुंबच्या समीर बने यांच्या बैलगाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. त्यांना रोख २१ हजार रूपये व चषक देवून गौरविण्यात आले. तर कोसुंबच्याच किरण जाधव द्वितीय क्रमांक पटकावत १५ हजार, चषक देण्यात आला. कडवईमधील राजाराम चव्हाण तृतीय क्रमांक ११ हजार व चषक तर पालीतील नितीन देसाई (चतुर्थ क्रमांक) ७ हजार, हरपुडे येथील जगन्नाथ कदम (पाचवा क्रमांक) ५ हजार रूपये व ढाल देवून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
तसेच स्पर्धेतील गावठी बैलजोड्यांमध्ये पाटगावमधील बाबू गोपाळ, आंगवलीतील अमोल गुरव व देवळेतील समीर आंब्रे यांना विशेष उत्तेजनार्थ बक्षीस देवून गौरविण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी माजी राज्यमंत्री रविंद्र माने, नेहा माने, प्रद्युम्न माने, सरपंच राजू जाधव. दिलिप जाधव आदिंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेला देवरूख पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवणेच आला होता.