(रत्नागिरी)
शेतकऱ्यांच्या न्याय लढ्यासाठी कोणत्याही परिस्थितीत राजू शेट्टी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे जाणार आहेत. यामध्ये मनाई आदेश करू नये. अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, अशी मागणी राजू शेट्टी यांच्यामार्फत अॅड. असिम सरोदे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना केली आहे.
राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी बारसू येथे भेट देण्यास मनाई आदेश केला आहे. सोशल मीडियावर देखील कोणत्याही प्रकारचे पोस्ट करण्यास मनाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या नोटीसला राजू शेट्टी यांनी उत्तर पाठवले आहे.
या नोटीसमध्ये म्हटले आहे की, राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये असतात, तसेच सक्रिय राजकारणात त्यांनी कधीच असंसदीय शब्दांचा वापर केला नाही. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते नेहमीच लढा देत आले आहेत. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार राजू शेट्टींना बारसू येथे जाण्यास तसेच प्रतिक्रिया देण्याचा अधिकार आहे.
शेट्टी यांच्या विरोधात काढण्यात आलेला आदेश बेकायदेशीर असून सदर मनाई आदेश तातडीने मागे घ्यावा; अन्यथा आम्हाला तुमच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही असिम सरोदे यांनी दिला आहे. तसेच राजू शेट्टी हे बारसू येथील अन्यायग्रस्तांच्या लढ्याला पाठिंबा द्यायला जाणारच असल्याचे त्यांनी कळवले आहे.