(राजापूर)
एसटीच्या संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे नव्वद टक्के कर्मचारी सोमवार पासुन कामावर हजर झाल्याने राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील फेऱ्यांसह लांब पल्याच्या काही गाड्या सुरु करण्यात आल्याने प्रवाशांमधुन समाधान व्यक्त होत आहे . मागील पाच महिने एसटीचा बेमुदत संप सुरु होता. त्यामध्ये बहुतांशी कर्मचारी संपात उतरल्याने राजापूर आगाराचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. काही कर्मचारीसंपात न उतरल्याने काही गाड्या सुरु होत्या. दरम्यान सोमवारी संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे नव्वद टक्के कर्मचारी राजापूर आगारात आपल्या कामावर रुजु झाले आहेत. त्यामुळे राजापूर आगारातुन ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या काही गाड्या सुरु झाल्या आहेत अशी माहिती राजापूर आगार व्यवस्थापनाने दिली आहे.
यामध्ये सायंकाळी चार वाजता राजापूर आगारातुन व पाच वाजता भालावलीतुन सुटणारी भालावली मुंबई ,सायंकाळी पाच वाजता सुटणारी पाचल – नालासोपारा,सायंकाळी साडेचार वाजता सागवेतुन सुटणारी सागवे – बोरीवली ,सकाळी आठ वाजता सुटणारी राजापूर तुळजापुर ,सकाळी साडेसहाची राजापूर पुणे , पावणेनउची सांगली, अणुस्कुरा मार्गे पावणे आठची सोलापूर ,आदी गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत तर रत्नागिरीमार्गे पुणे अशीही बससेवा सुरु करण्यात आली आहे.
लांब पल्ल्यांच्या या गाड्यांसह तालुक्याच्या ग्रामीण भागात देखील काही वस्तीच्या फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तुळसुंदे रत्नागिरी, आंबोळगड मार्गे वस्तीची गाडी, जांभवली, झर्ये , तुळसुंदे , कुंभवडे , अणसुरे , भालावली , मोरोशी , खारेपाटण, पडवे , देवाचे गोठणे, ताम्हाने आदी मार्गावर वस्तीच्या फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत.
आणखी काही फेऱ्या सुरु होणार असल्याची माहिती आगार सुत्रानी दिली यापुर्वी चुनाकोळवण, भालावलीसह काही ठिकाणच्या फेऱ्या सुरु झाल्याने प्रवाशांची गैरसोय दुर झाली असुन तालुक्यातुन आणखी काही फेऱ््यांसह लांबपल्याच्या गाड्या सुरु झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. राजापूर आगारातुन अणुस्कुरा मार्गे प्रत्येक दोन सांगली आणि पुणे व एक तुळजापूर अशा गाड्या सुरु झाल्याने कोकणामधुन कोल्हापूर व त्यापुढील मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच सोय झाली आहे.