( राजापूर )
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुणे येथील ग्लोबल स्कॉलर फाऊंडेशन या संस्थेचा यावर्षीचा रत्नागिरी भुषण बेस्ट सीईओ तथा मॅनेजिंग डायरेक्टर हा पुरस्कार राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांना जाहिर झाला आहे. याबद्दल अहिरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. २६ नोव्हेंबर रोजी पुणे बिबवेवाडी येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पद्मश्री पोपटराव पवार व डॉ. संजय माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव सोहळा होणार आहे.
ग्लोबल स्कॉलर फाऊंडेशन पुणे ही संस्था राज्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हयातुन दरवर्षी कतृत्ववान व्यक्तींचा शोध घेऊन ही संस्था त्यांचा गौरव करत असते. तर होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठीही ही संस्था काम करते.यावर्षीचा रत्नागिरी भुषण हा पुरस्कार या संस्थेने अहिरे यांना जाहिर केला आहे.
राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना अहिरे यांनी राजापूर अर्बन बँकेच्या प्रगतीसाठी केलेले काम व कार्य, ग्राहकांना आधुनिक सेवा सुविधा देत बँकेची केलेली प्रगती याची दखल घेत संस्थेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. अहिरे यांना यापुर्वी बँकिंग फं्रटीयर्स या अग्रगण्य संस्थेबरोबरच कर्नाड फाऊंडेशन व बी. डब्ल्यू बीझनेस सोल्युशन या मासिकाकडून बेस्ट सीईओ हे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तर राजापूर अर्बन बँकेला देखील विविध पुरस्कार प्राप्त करून देण्यात अहिरे यांनी महत्वाचे योगदान दिलेले आहे.
आपल्याला मिळालेला हा पुरस्कार हा बँकेचे संचालक मंडळ, सहकारी अधिकारी व कर्मचारी, बँकेचे सभासद आणि बँकेवर प्रेम करणारी तमाम जनता यांचा असल्याची प्रतिक्रिया अहिरे यांनी व्यक्त केली आहे. तर हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंंन्टचे अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार व संचालकांनी अहिरे यांचे अभिनंदन केले आहे.