( राजापूर )
मुंबई गोवा महामार्गावर ओणी येथे पेट्रोलपंप समोरील महावितरणच्या डिपीवर दुरूस्तीचे काम करताना वायरमनचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश बाबू गमरे (५२ रा. ओणी) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
गमरे यांची रविवारी सुट्टी असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कामावर बोलवले होते. ते सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान ओणी पेट्रोलपंपासमोरील महावितरणच्या डीपीवर दुरूस्तीचे काम करत असताना त्यांना जोराचा शॉक लागला. यातच ते जागीच गतप्राण झाले. शॉक लागलेल्या अवस्थेत ते डीपीला लटकत होते. या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले असून घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
गमरे हे गेले १५ ते २० वर्षे महाविरणमध्ये वायरमन म्हणून काम करत होते. रविवारी त्यांची आठवडा सुट्टी होती. सुट्टी असतानाही कामावर बोलविणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांबाबत तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.