( राजापूर / प्रतिनिधी )
तालुक्यातील तळवडेवाडी येथील एका वर्षाच्या बालकाच्या अचानक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आदर्श विजय हातणकर (१ वर्ष, तळवडे, राजापूर) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, तळवडे येथील आदर्श हातणकर याला घेउन आई खारेपाटण येथे सोमवार ९ जानेवारी रोजी माहेरी आली होती. मात्र आदर्शला सोमवारी अचानक अस्वस्थ वाटू लागले. नातेवाईकांनी लगेचच उंबलें येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र येथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेने आई गर्भगळीत झाली. नातेवाईकांनी हंबरडा फोडला. बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.
या घटनेची खबर बाळाचे वडिल विजय हातणकर यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. विच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे. मात्र जन्मापासूनच या बालकाची प्रकृती नाजूक होती असे नातेवाईकांकडून सांगितले जात आहे.