(राजापूर / प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील हातीवले कोंडये, येथे तापाने आजार पडलेल्या नवविवाहितेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना 25 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वा. च्या सुमारास घडली. प्रिया प्रमोद शिंदे (34, हातीवले, कोंडये, राजापूर) असे मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पती प्रमोद याने राजापूर पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया शिंदे यांना 25 ऑक्टोबर रोजी तापाने आजारी पडल्या. त्यांना उपचारासाठी बावकर हॉस्पीटल राजापूर येथे नेण्यात आले. त्यानंतर उपचार करून त्यांना पुन्हा घरी आणले. मात्र घरी आल्यावर तिला अचानक जास्त त्रास जाणवू लागल्याने तब्येत पुन्हा बिघडली, म्हणून पुन्हा बावकर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल करण्यास सांगितले. 108 अॅम्ब्युलन्सने तिला रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. याबाबत राजापूर पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.