(राजापूर)
शासनाच्या ‘माझी वसुंधरा ‘ योजनेंतर्गत कोकण विभागातून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राजापूर तालुक्यातील अणसुरे ग्रामपंचायतीला 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झालं आहे. उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या ग्रामपंचायतीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते मुंबई नरिमन पॉइंट टाटा थिएटर येथे सन्मान व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
गावाच्या जैवविविधतेवर आधारित वेबसाईट बनवणारी देशातील पहिली ग्रामपंचायत अणसुरे ठरली आहे. ‘अणसुरे जैवविविधता’ असे या संकेत स्थळाचे नाव आहे. या संकेतस्थळावर स्थानिक वृक्ष, वेलवर्गीय, वनस्पती, मासे, कीटक, पक्षी इत्यादी जैवविविधता प्रकारची माहिती फोटोसहित प्रकाशित करण्यात आली आहे. शिवाय गावातील प्राणी, पक्ष्यांचे महत्वाचे अधिवास, देवराई याबाबत माहितीपर नोंदी या संकेस्थळावर उपलब्ध आहेत.
राज्यातील 8 ग्रामपंचायती मधून अणसुरे ग्रामपंचायतीची नोंद करण्यात आली आहे. या सर्व ग्रामपंचायतीचे परीक्षण राज्यस्तरीय समितीकडून करण्यात आले. आणि त्यातूनच अणसुरे ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यात विविध मानाचे पुरस्कार मिळवणाऱ्या या ग्रामपंचायतीला मिळालेल्या 1 कोटी रुपयांच्या बक्षिसाची रक्कम जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचयतीकडे वर्ग करण्यात येणार आहे.