(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील रहाटाघर येथे उसाची हातगाडी लावून रस विक्री करणार्या तरुणाला रिक्षातील 4 जणांनी उसाच्या दांडक्याने मारहाण केल्याची घटना 28 नोव्हेंबर रोजी घडली. या मारहाणप्रकरणी रिक्षातील 4 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद महम्मद करीम शदाम (31, थिबा पॅलेस येथे भाडयाने, मूळ उत्तरप्रदेश) याने शहर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महम्मद शदाम हा रहाटाघर येथील पेट्रोल पंपाच्या बाजूला 28 नोव्हेंबर रोजी उसाची हातगाडी लावून रस विक्रीचा व्यवसाय करत होता. दरम्यान सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास रिक्षा (एमएच 08-5152) मधून चार अनोळखी पुरुष आले. त्यांनी काहीही कारण नसताना महम्मद याचे गाडीतील उसाच्या कांडया काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. डोक्यावर, पाठीवर, हातावर, पायावर मारुन जखमी केले. तसेच उसाची गाडी पाडून सामानाची नासधूस करुन ठार मारण्याची धमकी दिली.
महम्मद शदाम याने शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी रिक्षा क्रमांक एमएच 08 5152 मधील चार जणांवर भादविकलम 324, 323, 504, 506, 424, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.