(रत्नागिरी)
वाहतूक नियमांसंबंधी जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी व वाहतूक नियंत्रण शाखा, रत्नागिरी, पोलीस दल रत्नागिरी आणि रत्नागिरी वकील संघ यांच्या संयुक्त विदयमाने रत्नागिरी शहरात बुधवार दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी वाहतूक आणि रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रत्नागिरी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली.
वाहतूक शिस्तीचा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होणे, लोकांनी स्वत:हून आपली व इतरांचीही सुरक्षितता सांभाळली पाहिजे. यादृष्टीने त्यांच्यात जागृती होणे गरजेचे असल्याचे मत वाहतूक आणि रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केले.
जिल्हा न्यायालयाच्या आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा पोलिस दल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी वाहतूक आणि रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य न्याय दंडाधिकारी राहूल चौत्रे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निखिल गोसावी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हनकर, जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर आणि वकील बार संघाचे अध्यक्ष दिलीप धारिया, सरकारी वकील अनिरूद्ध फणसेकर आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.
प्रारंभी प्राधिकरणचे सचिव निखिल गोसावी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दुचाकीचे होणारे अपघात आणि त्यात होणारे मृत्यू हे केवळ आणि केवळ हेल्मेट न घातल्याने होत असल्याचे दिसून येते. युवा पिढी ही देशाचे भवितव्य असल्याने या पिढीने हेल्मेट घातलेच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.