(रत्नागिरी)
“सुरक्षित वाहन चालक हा अपघात टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. त्यामुळे संभाव्य जीवित हानी, कायम अपंगत्व व आर्थिक नुकसान टळते. म्हणूनच सुरक्षित चालक हा रस्त्यावर देवदूताच्या भूमिकेत असतो,” असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली चे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी केले. ते कोकण कृषि विद्यापीठ वाहन चालक संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रम शृंखलेअंतर्गत रत्नागिरी येथे पार पडलेल्या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
“विद्यापीठात कार्यरत असलेले सर्व वाहन चालक हे गेली अनेक वर्षे सातत्याने सुरक्षित वाहन चालक म्हणून काम करत आहेत. त्यापैकी अनेक जणांनी विना-अपघात सेवा बजावून आपले सेवा कर्तव्य पार पाडलेले आहे व भविष्यात पाडत राहतील”, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कोकण कृषि विद्यापीठ वाहन चालक संघटना रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असताना गेले वर्षभर पार पाडलेल्या विविध कार्यक्रमांचे व लोकाभिमुख उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. त्याचबरोबर आपल्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात वाहन चालकांशी संबंधित आठवणींना उजाळा देऊन चालक सेवा दिलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.
कोकण कृषि विद्यापीठ वाहन चालक संघटना सन २०२२-२३ हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत आहे. त्या औचित्याने प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पालघर ते सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यात, त्या-त्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विद्यापीठाच्या महाविद्यालये, संशोधन संस्था यांचे सहकार्याने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. त्या शृंखलेतील रस्ता वाहतूक: सुरक्षा आणि नियम या विषयावरील नववा कार्यक्रम वजा कार्यशाळा रत्नागिरी येथे पार पडली. ही कार्यशाळा मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी; कृषी संशोधन केंद्र, शिरगांव; नारळ संशोधन केंद्र, भाट्ये; सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झांडगांव; विस्तार शिक्षण विभाग, कृषि महाविद्यालय, दापोली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली चे माजी कुलगुरू डॉ श्रीरंग कद्रेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. प्रसाद सानप, मोटर जगत मासिकाचे संपादक व गेली चाळीस वर्षे रस्ता वाहतूक व सुरक्षा याविषयी मार्गदर्शन करणारे श्री. राजेंद्रप्रसाद मसूरकर, तर व्यासपीठावरील मान्यवरांमध्ये डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, वाहन चालक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्री. राकेश विचारे, मत्स्य महाविद्यालय, शिरगांव रत्नागिरी चे विभागप्रमुख डॉ. सुरेश नाईक, कृषी संशोधन केंद्र, शिरगांव चे प्रमुख डॉ. विजय दळवी, नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे, सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रतिनिधी म्हणून श्री. कल्पेश शिंदे, वाहन चालक संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. प्रमोद पोळेकर, विद्यमान उपाध्यक्ष श्री. मिलिंद बालगुडे, सचिव श्री. संजय पवार आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे शाल, श्रीफळ व जासवंदीचे रोप देऊन तर इतर उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतरच्या तांत्रिक सत्रात प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. प्रसाद सानप यांनी रस्ता वाहतूक, सुरक्षा व कायदा याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंका समाधान केले. तर मोटार जगतचे संपादक श्री. राजेंद्रप्रसाद मसूरकर यांनी आपल्या ४० वर्षांच्या अनुभवातून वाहन निगा, दुरूस्ती, सुरक्षित वाहन चालन, अपघात होण्याची कारणे व ते टाळण्यासाठी उपाय याविषयी पाॅवर पाॅईंटच्या माध्यमातून सादरीकरण केले.
या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, कर्मचारी, निवृत्त वाहन चालक, विद्यार्थी तसेच नागरीक उपस्थित होते. हा कार्यक्रम रत्नागिरीत पटवर्धन हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. प्रविण झगडे यांनी केले. प्रास्ताविक संघटनेचे सचिव श्री. संजय पवार, तर संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती अध्यक्ष श्री. राकेश विचारे यांनी दिली. कार्यक्रमाची छायाचित्रे श्री कुलदीप सातपुते यांनी टीपली.
या कार्यशाळेसाठी वाहन चालक संघटनेचे उपाध्यक्ष श्री.मिलिंद बालगूडे, सचिव श्री. संजय पवार, सदस्य सर्वश्री संजीवन पाटोळे, अरुण नवाळे, काकासाहेब कारखिले, मुकुंद देवूरकर, सचिन शिगवण, प्रवीण पवार, बंडू जंगले, सुनील हेलगांवकर, पराग साळवी, ओंकार जावकर, माजी अध्यक्ष श्री.प्रमोद पोळेकर, श्री.सुभाष मोरे, माजी सदस्य श्री.गोपीनाथ शिंदे तसेच श्री. शामसुंदर तोडणकर हे उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली चे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राकेश विचारे, श्री प्रमोद पोळेकर, श्री. अण्णासाहेब कारखिले आणि श्री. मुकुंद देवुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.