(रत्नागिरी)
सध्या सुरु असलेली रत्नागिरी-सैतवडे ही बस फक्त सैतवडे पोस्टापर्यंत येत आहे. वास्तविक ही बस कोरोना कालावधीपूर्वी पेठ मोहल्यापर्यंत जात होती. सध्या ही बस पोस्ट ऑफिस पासून परत जाते. या संदर्भात संबंधिताना अनेकवेळा निवेदन देण्यात आले. व वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्याशी प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले.
सुरवातीचे काही दिवस बस पेठ मोहल्यापर्यंत पाठवण्यात आली. त्यानंतर पुन्हा ही बस बंद करण्यात आली. त्यामुळे सर्व नागरिकांना या बस सुविधेचा फायदा होत नाही. पुढे पोस्ट ऑफीसपर्यंत लोकांना रिक्षा करून यावे लागते. गोरगरीबांना ते शक्य नाही. या गावात असलेला मच्छीमार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ते आपली मासळी विकण्यासाठी खंडाळा व परिसरात जात असतात. त्यांनाही या बसचा काहीही उपयोग होत नाही.
धाकटी जांभारी येथील मच्छीमार बांधवांना खंडाळा येथे जाण्यासाठी या एकमेव बसचा उपयोग होतो. आता त्यांना मोती पीर दर्ग्यापर्यंत येणाऱ्या बसने जावे लागते. त्यामुळे या गावातील लोकांना या गावातील बसचा काहीच उपयोग होत नाही. येथून खंडाळ्याला जाण्यासाठी दुस-या गावात जावे लागत आहे. रत्नागिरी डेपोने याबाबतीत खुलासा करावा अशी आग्रही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.