( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शहरातील टीआरपी ते शिवाजी नगर असा दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिलेचा पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आरती गणेश जाधव (49, मुळ ओरी, सध्या टीआरपी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या अपघातप्रकरणी दुचाकीस्वार सिध्देश विठ्ठल मटकर (24, वठारवाडी,पेंडखले, राजापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिध्देश मटकर हा आपल्या ताब्यातील युनिकॉर्न दुचाकीवरून टीआरपी ते शिवाजीनगर असा चालला होता. यावेळी काळे सर्व्हिसिंग रॅम्प समोर भरधाव दुचाकीवरून पडून आरती जाधव रस्त्यावर आदळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. हयगयीने गाडी चालवून जाधव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकीस्वार सिध्देश मटकर याच्यावर भादवी कलम 304 (अ), 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184, 146, 115 (7), 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.