(रत्नागिरी )
‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी अवस्था सध्या जिल्हा रुग्णालयाची आहे. रिक्त पदांअभावी जिल्हा रुग्णालयाला पुन्हा एकदा घरघर लागण्याची शक्यता आहे. 31 मे ला भुलतज्ज्ञांसह रेडिओलॉजिस्ट सेवानिवृत्त होत आहे. यामुळे 1 जूनपासून जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन यंत्रणा ठप्प होणार आहे. तर शस्त्रक्रियागृहाची मदार एकाच भुलतज्ज्ञावर राहणार असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात रुजू झालेले अन्य एक रेडिओलॉजिस्ट पदभार स्विकारुन दोन महिन्याची रजा टाकून गायब झाल्याने आता त्यांना शोधून आणण्याची वेळ जिल्हा रुग्णालयावर आली आहे.
रत्नागिरीचे जिल्हा शासकीय रुग्णालय या ना त्या कारणावरुन चर्चेत राहिले आहे. सध्या रुग्णालयात बालरोगतज्ज्ञांसह सिनीअर स्त्रीरोगतज्ज्ञ आणि ऑर्थोपेडिक सर्जनची गरज आहे. त्यातच आजही जिल्हा रुग्णालयाला कायमस्वरुपी फिजिशिअन न मिळाल्याने जिल्हा रुग्णालयात सध्या कामचलाऊ मोहिम सुरू आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात फिजिशिअनची दोन पदे मंजूर आहेत. मात्र ही दोन्ही पदे रिक्त असून सध्या कंत्राटी पद्धतीने एक पद भरण्यात आले आहे. तर स्त्रीरोगतज्ज्ञाच्या 3 जागा मंजूर आहेत. त्यापैकी दोन जागा भरल्या असून 1 जागा आजही रिक्त आहे.
अस्थिव्यंगतज्ज्ञ म्हणून जिल्हा रुग्णालयात दोन पदे मंजूर आहेत. त्यातील दोन्ही पदे सध्या रिक्त आहेत. डॉ. प्रमोद सुर्यवंशी हे 2020 मध्येच राजीनामा देऊन बाहेर पडले आहेत. तर डॉ. नागेश काशींद्र वाघमारे हे 2018 मध्ये जिल्हा रुग्णालयात रुजू झाले आहेत. अस्थिव्यंगतज्ज्ञ म्हणून गट अ मध्ये रुजू झालेले डॉ. नागेंद्र वाघमारे यांनी 2018 मध्ये जिल्हा रुग्णालयात अस्थिव्यंगतज्ज्ञ म्हणून पदभार स्विकारला मात्र 26 नोव्हेंबर 2019 पासून डॉ. वाघमारे कामावर गैरहजर आहेत. वारंवार त्यांना कामावर हजर होण्याबाबत कळवण्यात आले आहे. मात्र 2019 पासून अस्थिव्यंगतज्ज्ञ कामावरुन बेपत्ता असल्याची बाब आता पुढे आली आहे.
एकीकडे जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांची वानवा जाणवत असताना आता प्रमुख पदे रिक्त होणार असल्याने जिल्हा रुग्णालयावर मोठे संकट ओढवणार आहे. भुलतज्ज्ञांसह रेडिओलॉजिस्ट निवृत्त होणार असल्याने शस्त्रक्रियागृहासह सिटीस्कॅन यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता आहे.
26 एप्रिल 2022 रोजी डॉ. भोगे हे रेडिओलॉजिस्ट म्हणून जिल्हा रुग्णालयात रुजू झाले. रुजू झाल्यानंतर 1 मे पासून ते सुट्टीचा अर्ज टाकून अचानक गायब झाले. केवळ 4 दिवस काम करून पाचव्या दिवशी डॉ. सुट्टीवर पळून गेले आहेत ते अद्याप कामावर परतलेले नाहीत. या डॉक्टरनादेखील जिल्हा रुग्णालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
1 रेडिओलॉजिस्ट सेवानिवृत्त होत असून दुसरे रेडिओलॉजिस्ट अवघे 4 दिवस कर्तव्य बजावून सुट्टीवर पळून गेले आहेत. त्यामुळे 31 मे ला डॉ. नागणे हे सेवानिवृत्त झाल्यास सिटीस्कॅन यंत्रणा पुर्णपणे ठप्प होणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आत्तापासून शोधाशोध सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूलतज्ज्ञ वर्ग 1 डॉ. कांबळे यांसह रेडिओलॉजिस्ट डॉ. नागणे, कामथे येथील डॉ. भोई व वर्ग 4 चे 4 कर्मचारी आणि शस्त्रक्रियागृह परिचर असे सेवानिवृत्त होणार आहेत.
सध्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे. शासनाने बदलीवरचा स्टे उठवला आहे. गेले 2 वर्ष कोरोनाकाळात शासकीय बदल्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे आरोग्य सेवेतील पदे भरता आली नव्हती. आता बदल्यांवरची बंदी उठवण्यात आल्याने जिल्हा रुग्णालयातील रिक्त जागा भरण्याची संधी चालून आली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब याकडे लक्ष देतील का? असा प्रश्नदेखील आता उपस्थित झाला आहे.