(रत्नागिरी/प्रतिनिधी)
महाराष्ट्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली असताना अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मात्र अशातच बहुतांश ठिकाणी भात लावणीची कामे सुरु झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. पाच ते सहा दिवसापासून जोरदार पाऊसाचा इशारा हवामान खाते देत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मासेबाव, करबुडे या ठिकाणासह इतर ठिकाणी भात लावणीची लगबग सुरु झाली आहे. पावसाच्या सरींमुळे भात खाचरांमध्ये पाणी साचलेले आहे. या पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पॉवर टिलरने नांगरणी करून पावसाच्या पाण्यावरील भातशेती आटपण्यावर भर दिला आहे.
मासेबाव करबुडे या भागातील शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस पडताच भात पेरणी केली होती. त्यानंतर जुन महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या चांगल्या पावसानंतर भाताची रोप मोठी झाली. यातच अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरीमुळे भात रोपाची चांगली वाढ झाली. त्यात आठ दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने भात खाचरामध्ये चांगले पाणी देखील आले. यामुळेच चांगले भात पिक येण्याच्या उद्दिष्टाने पाण्याची सोय झालेल्या शेतकऱ्यांनी लावणीला सुरुवात देखील केली आहे.