(रत्नागिरी)
पालिकेच्या मालकीचे अनेक गाळे रिकामे आहेत. कोणतीही परवानगी न घेता किंवा भाडे न भरता परस्पर शटर उघडून काही जणांकडून गाळ्यांचा वापर होत असल्याचे मालमत्ता विभागाला आढळून आले आहे. त्यामुळे मालमत्ता विभागाने अशा गाळ्यांचे शटर दुरुस्ती करून घेण्याचे नियोजन केले आहे.
रत्नागिरी पालिकेच्या मालकीच्या अनेक इमारती आहेत. भाजीमार्केट, मच्छीमार्केट, व्यापारी संकूल अशा स्वरूपातील इमारती असून, त्यामध्ये अनेक गाळे रिकामे आहेत. त्रिसदस्यीय समितीच्या निर्णयानुसार ठरलेली प्रीमियम रक्कम आणि भाडे परवडणारे नसल्याने अनेक गाळे तसेच पडून आहेत. अनेक वर्षांपासून रिकामे असलेल्या या गाळ्यांचे शटर तुटलेले आहेत. याकडे पालिका लक्ष देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी हे गाळे परस्पर वापरण्यास सुरवात केली आहे. हा प्रकार आता निदर्शनास येत आहे.