( रत्नागिरी / प्रतिनिधी )
जमिनीच्या वादातून रत्नागिरीतील वृध्दाला गुहागर येथे मारहाण झाल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास घडली. शांताराम शंकर पुनसकर (७२, पानवल, रत्नागिरी) असे जखमी झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत शांताराम पुनसकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर दत्ताराम सुर्वे, अनिल प्रभाकर सुर्वे (दोन्ही रा. पडवे, गुहागर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम पुनसकर आणि मनोहर सुर्वे, अनिल सुर्वे यांच्यात जमिन जागेवरुन वाद आहेत. ३० नोव्हेंबर रोजी शांताराम पुनसकर हे गुहागरातील पडवे डुगे येथे गेले असता मनोहर आणि अनिल सुर्वे या दोघांनी लोखंडी पाईपने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत ७२ वर्षीय शांताराम पुनसकर हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शांताराम यांनी गुहागर पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार मनोहर सुर्वे, अनिल सुर्वे यांच्यावर भादविकलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.