(खेड / भरत निकम)
रत्नागिरीतील देहविक्री व्यवसायाच्या तपासात मुख्य सुत्रधारासह ९ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असतानाच खेडमधील दवबिंदू फार्महाऊसवर पोलीसांनी कारवाई करत एका महीलेसह ५० वर्षीय रविंद्र गणपत गावडे याला अटक केली आहे. या खळबळजनक प्रकाराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या फार्महाऊसवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीनंतर येथे उठबस करणाऱ्यांचे पितळ आपोआप उघडे पडणार आहे.
रत्नागिरीच्या शिवाजीनगर भागात भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये दोन महीलांसह मुख्य आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले होते. दोन पिडीत महीलांची रवानगी महीला आधार केंद्रात केली होती. याचा तपास पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी करतांना या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तब्बल मुख्य सुत्रधारासह ९ जणांना शोधून काढले आहे. पुढचा तपास सुरुच आहे. हे तपासाचे काम सुरु असतानाच खेड -दापोली मार्गावर चिंचघर वेताळवाडी येथील दवबिंदू फार्महाऊसवर देहविक्री चालू असल्याची माहिती खेडच्या पोलीसांना प्राप्त झाली होती. त्यांनी पथकासह धाड टाकून महीलेसह मुख्य सुत्रधारास ताब्यात घेतले. त्या दोघांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.
महिला, मुलींच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत तसेच अनेक महिलांच्या आर्थिक समस्यांवर मार्ग काढण्यासाठी त्यांना आर्थिक स्त्रोत निर्माण करण्यासाठी वेश्याव्यवसाय करण्याचा मार्ग दाखवत दवबिंदू फार्महाऊस येथे देहविक्री करण्यास भाग पाडले जात होते. खेड -दापोली मार्गावरच्या दवबिंदू फार्महाऊस हे पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेराच्या नेटवर्क मध्ये होते. येथे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे विविध कार्यक्रम, मित्र मैत्रिणी यांच्या पार्ट्या होत असत. अनेकदा ओल्या-सुक्या पार्टी करीता दवबिंदू गेल्या अनेक वर्षांपासून नावाजलेले होते. पार्टी नंतर जेवणाचीही व्यवस्था येथे केली जात असे. हा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीखाली आहे. या कॅमेरामधील तपासही महत्वपूर्ण आहे. या दिशेने पोलीसांनी तपासाची चक्रे फिरली तर आणखीन काही जण हाती लागण्याची दाट शक्यता आहे.