(गणपतीपुळे /वैभव पवार)
भाजपचे रत्नागिरी तालुका सरचिटणीस, प्रसिद्ध मंडप डेकोरेटस तथा मालगुंडचे सामाजिक कार्यकर्ते सचिन दुर्गवळी आणि मालगुंड तलाठी कार्यालयाचे कोतवाल तथा मालगुंड परिसरातील एक नामांकित कबड्डी खेळाडू सुशील दुर्गवळी यांचे वडील शांताराम कृष्णा दुर्गवळी यांचे रविवारी २५ जून रोजी सायंकाळच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. शांताराम दुर्गवळी हे गेले काही दिवस आजारी होते. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सायंकाळी त्यांना आपल्या घरी आणल्यानंतर त्यांचे काही वेळातच आकस्मिक निधन झाल्याने संपूर्ण मालगुंड परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
शांताराम दुर्गवळी हे संपूर्ण मालगुंड परिसरात ‘दादा’ या टोपण नावाने ओळखले जात. अतिशय शांत व मनमिळाऊ स्वभाव, साधी राहणी आणि प्रत्येक लहानथोरांशी आपुलकीने व प्रेमाने वागणे असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. तसेच चेहऱ्यावर सतत स्मितहास्य, प्रचंड मेहनती, स्पष्टवक्तेपणा, कुणालाही न दुखावणारी देहबोली ही त्यांच्या व्यक्तीमत्वाची खास वैशिष्ट्ये होती. उत्तम ताशे वादक म्हणून त्यांची मालगुंड परिसरात मोठी ओळख होती. आपल्या तीनही मुलांवर अत्यंत चांगले संस्कार करून त्यांनी आपल्या आयुष्यात नावलौकिक मिळवले. मालगुंड जोशीवाडी येथील धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असे. तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सहभागी होत असत. मालगुंड जोशीवाडी येथील चंडिका नवरात्र उत्सव मंडळाचे विद्यमान अध्यक्ष म्हणून ते काम करीत होते. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजताच अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी आणि विविध स्तरातील व्यक्तींनी व संपूर्ण मालगुंड परिसरातील ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले.
यावेळी मोठ्या संख्येने त्यांच्या अंत्ययात्रेला सर्व ठिकाणचे लोक उपस्थित होते.तसेच सर्वच स्तरातील व्यक्तींनी संपूर्ण दुर्गवळी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होऊन त्यांचे सांत्वन केले. कालकथित शांताराम दुर्गवळी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.