(जाकादेवी/ संतोष पवार)
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी आणि संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी शहरातील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय निवासी बौद्धाचार्य शिबिराचा सांगता समारंभ आज सोमवार दि.२४ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.
या शिबिरात शिबिरार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती मुंबईचे अतिरिक्त चिटणीस रविंद्र पवार,बौध्दजन पंचायत समिती मुंबईच्या संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार, सचिव मनोहर मोरे उपस्थित आहेत.
या शिबीरात तालुक्यातील ६० शिबीरार्थी सहभागी झाले आहेत. शिबीराचे उद्घाटन प्रमुख मार्गदर्शकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
उद्घाटन समारंभ आणि हे संपूर्ण शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रत्नागिरी तालुका शाखेचे उपक्रमशील व धडाडीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली घेण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक रविंद्र पवार, मंगेश पवार आणि मनोहर मोरे यांचेसह रत्नागिरी तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, संस्कार समितीचे सभापती संजय आयरे, सरचिटणीस रविकांत पवार आदींसह तालुका शाखेचे माजी अध्यक्ष तु. गो.सावंत, कला, क्रीडा समितीचे सभापती कृष्णा जाधव, आरोग्य समितीचे सभापती दिनकर कांबळे, माजी सैनिक आर.डी. सावंत, रत्नागिरी तालुका शाखेच्या संस्कार समितीचे बौद्धाचार्य व श्रामणेर बहुसंख्येने उपस्थित होते.
या शिबिरात महिला-पुरुष-विद्यार्थी असे एकूण ६० शिबिरार्थी सहभागी झाले आहेत. बौद्ध धम्मातील पुजा पाठ, पंचशील, धार्मिक विधी गाथा,धम्ममाचारण , व्यक्तिमत्त्व विकास, बौद्ध धम्माचे प्रचारक व प्रसारक व्हावेत हे या शिबीराचे उदात्त उद्दिष्ट आहे. सदरचे तीन दिवसीय शिबिरात सहभागी झालेल्या शिबीरार्थ्यांची दोन गटांत लेखी परीक्षा घेऊन संबंधित शिबीरार्थींना बौद्धाचार्य सनदकार्ड व प्रमाणपत्र वितरित केली जाणार असल्याची माहिती रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समितीच्या आयोजकांकडून सांगण्यात आले.
सदरचे निवासी शिबीर यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उपसमित्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तालुक्यातील गाव शाखा, बौद्धाचार्य, श्रामणेर मेहनत घेत आहेत. प्रत्येक वर्षी असे शिबीर या समितीतर्फे अतिशय उत्तम नियोजनाने राबविले जाते.यावर्षीही बौध्दाचार्य शिबीराचे नेटकेपणाने नियोजन करण्यात आले आहे.