रत्नागिरी : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा प्रचंड प्रसार थांबविण्यासाठी लसीकरण वेग वाढवण्याची आवश्यकता असून, रत्नागिरी जिल्ह्यासाठी अतिरिक्त लसीचा पुरवठा करावा अशी मागणी रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हा कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. प्रतिदिन पाचशेच्या घरात रुग्ण सापडत आहे. हा प्रसार गेले दोन महिने याच गतीने सुरू आहे. प्रतिदिन पंधरा ते वीसच्या सरासरीत माणसे मृत्युमुखी पडत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था तोकडी पडत आहे. जिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी एम. डी. फिजिशियन डॉक्टर उपलब्ध नाही. गावोगावची आरोग्य केंद्रामध्येही सुविधा, वैद्यकीय अधिकारी यांची संख्या खूप अपुरी आहे. गेले दोन महिने जवळजवळ लॉकडाऊन सुरू आहे. मात्र रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. रुग्णसंख्येवर मर्यादा आणायची असेल तर मुबलक लसीकरण करणे हाच पर्याय दिसतो. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग अत्यंत मंद आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रतिदिन किमान दहा हजार नागरिकांचे लसीकरण आवश्यक आहे. लसीकरणाचा वेग वाढवणे अत्यावश्यक आहे. तरच कोरोना प्रसाराचा वेग मंदावेल. राज्य शासनाचा व्यवहार गलथान आहे. शासन – प्रशासन समन्वयाचा अभाव आहे आणि शिवसेना लसीकरणाचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रचारासाठी करीत आहे. त्यामुळे सर्वदूर जनतेला लस प्राप्त होताना अडचणी येत आहेत. कृपया आपण रत्नागिरी जिल्ह्याचा अहवाल मागवून घ्यावा व रत्नागिरी जिल्ह्यासाठी अतिरिक्त लस पुरवठा तात्काळ करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत अशी मागणी ऍड. पटवर्धन यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे केली आहे.