रत्नागिरी : जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओमुक्त जग करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार मोहीम राबवली जात असून, बालकांना पोलिओ हा रोग अपंगत्व आणतो व त्यामुळे येणार्या लुळेपणामुळे बाळाचे भवितव्य अंधारमय होते.
पल्स पोलिओ मोहीम उद्या २७ फेब्रुवारी रोजी होणार असून, जिल्ह्यातील एकूण ८३ हजार २६४ बालकांना ही लस दिली जाणार आहे. यासाठी एकूण १९१० बुथ स्थापन केली आहेत. त्याचबरोबर ३५ ट्रान्झीट टीम रेल्वेस्टेशन, बसस्थानक येथे नियुक्ती केली असून ११२ मोबाईल टीम आहेत. त्याचबरोबर ४ हजार कर्मचारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्यरत असतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतामध्ये १३ फेब्रुवारी २०११ नंतर एकही पोलिओ रूग्ण आढळलेला नाही तर रत्नागिरी जिल्ह्यात १९९८ पासून एकही रूग्ण सापडला नसल्याचे दिसून आले आहे. या मोहिमेत एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी नियोजन करण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाबरोबरच इतरही संस्थांचा सहभाग आहे.
ग्रामीण भागात ७० हजार ३६० व शहरी भागामध्ये १२ हजार ९०४ असे एकूण ८३ हजार २६४ बालकांना ही लस देण्यात येणार आहे. ग्रामीण भागामध्ये १८२६ व शहरी भागामध्ये १८४ असे एकूण १९१० लसीकरण बुथ स्थापन करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ११२ मोबाईल टीम, ३५ ट्रान्झीट टीम रेल्वेस्टेशन व बसस्थानक येथे नियुक्ती करण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर एकूण ४०४७ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नजीकच्या लसीकरण केंद्रात जाऊन ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना हा डोस पाजून घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.