(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख तीन राष्ट्रीय महामार्गसह राज्य मार्गांवर गेल्या चार वर्षामध्ये सातत्याने अपघातांना आळा घालण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस शाखेकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असूनही मागील वर्षीच्या तुलनेत गतवर्षी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ऐकीकडे जिल्ह्य़ातील सर्वच राज्य व राष्ट्रीय महामार्गाची चौपदरीकरण व इतर कारणांनी दुरावस्था झालेली असतानाही महामार्ग वाहतूक पोलीसांनी सार्वजनीक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी समन्वय राखत रस्त्याचे अपघात होणारे ब्लॅक स्पॉट व इतर उपाययोजना करून घेऊन अपघात रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
महामार्ग वाहतूक पोलीस रत्नागिरी विभागाच्या अखत्यारित कशेडी,चिपळूण, हातखंबा अशी तीन महामार्ग पोलीस मदत केंद्रे आहेत. त्यांच्या अखत्यारित मुंबई गोवा महामार्गाचे पोलादपूर ( जि.रायगड)ते मोरवंडे 75 कि.मी., मोरवंडे ते बावनदी 98 कि.मी.,बावनदी ते खारेपाठन (जि.सिंधुदुर्ग)90 कि.मी. अशी तर गुहागर विजापूर महामार्गाचे चिपळूण ते मंडणगड 75 कि.मी.,चिपळूण ते कराड 50 कि.मी. तर मिरा नागपूर महामार्गाचे मिरागाव ते आंबागाव (जि.कोल्हापूर) 73 कि.मी. असे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग येतात तर खेड ते पोलादपूर 50 कि.मी. ,संगमेश्वर ते साखरपा 30 कि.मी.,वहाळ ते आबलोली 60 कि.मी. ओणी ते पाचल 40 कि.मी. असे राज्य मार्ग येतात.
कशेडी,चिपळूण, हातखंबा या तीन पोलीस मदत केंद्राच्या अखत्यारित राष्ट्रीय व राज्य महामार्गाचेवर गतवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये ऐकून २१६ अपघात झाले त्यात ५६ प्राणांतिक अपघातात ६५ मयत झाले तर ५३ जखमी झाले तर गंभीर जखमी ६६ अपघातामध्ये १४६ ,किरकोळ जखमी ५८ अपघातात १३० जखमी, विना दुखापत ३६ अपघात झाले आहेत. म्हणजे तुलनात्मकरीतीने मागील तीन वर्षांत अपघात कमी झाले होते सरासरी मयत होण्याचे प्रमाण मात्र वाढले आहे. तर गंभीर जखमी, किरकोळ जखमींचे प्रमाण वाढले आहे.
रत्नागिरी विभाग महामार्ग वाहतूक पोलीस निरीक्षक रेश्मा कुंभार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, महामार्गांवर वाहतुकीमध्ये प्रचंड वाढ झालेली होती यावेळी काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतात त्याचा फटका इतर वाहनांना बसुन अपघात होतात त्यासाठी शिस्त लागण्यासाठी कारवाई केली जाते. ब्लॅक स्पॉटवर विशेष लक्ष देऊन त्याठिकाणी सार्वजनीक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी पाठपुरावा करुन उपाययोजना केल्या जातात तसेच चौपदरीकरणातील अपुर्ण कामांच्या ठिकाणी पर्यायी वळण रस्ते काढून तिथे फलक लावले, रिफ्लेक्शन बोर्ड लावणे, उपाययोजना करुन अपघात रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
इंटरसेप्टरद्वारे अति वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. वाहन चालविताना मोबाईल वर चालकाने संभाषण करणे, वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणे, अवजड वाहनांना पुढे व मागे रिफलेक्टर न लावणे, हेल्मेट न घालणे व इतर प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई व प्रबोधन केले जाते आहे. अपघातग्रस्तांसाठी पहिल्या गोल्डन अव्हरमध्ये प्रशिक्षित मृत्युंजयदूत अपघाताच्या ठिकाणी पोहचून प्रथमोपचार करुन जखमींना जीवनदान देण्याची महत्वपूर्ण भुमिका बजावत आहेत. वाहन चालक नशापाणी करुन वाहन चालवून अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे लक्षात आल्याने महामार्गावर वाहन चालकांची अचानकपणे ब्रीथ अॅनालायझर तपासणी मोहिम राबवण्यात येते अश्या उपाययोजना केल्या जात आहेत.
रेश्मा कुंभार, वाहतूक पोलीस निरीक्षक, रत्नागिरी विभाग महामार्ग
जिल्ह्यात अपघातांना आळा घालण्यासाठी मोहीम यापुढे सुरूच राहील. तसेच वाहनचालकांनी वाहतुक नियमांचे पालन केले पाहिजे, वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. चालकांचे प्रबोधन करण्याचे काम आम्ही कायम करत राहणार आहोत, त्यातून काही प्रमाणात यश येत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल.