(चिपळूण /ओंकार रेळेकर)
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समिती, लोककला उपसमितीची बैठक स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, चिपळूण येथे लोककला उपसमितीचे सदस्य जगन्नाथ हिलीम, प्रा.डॉ.रूपेश कोडीलकर, बाबाजी कोरडे, प्रा.माणिक पट्टेबहादूर, प्रा.डॉ.दौलतराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सभेला कोकणातील नमन, कलगी तुरा व जलसा लोककलेतील लोककलावंत व लोककला अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बैठकीत प्रामुख्याने कोकणातील नमन व कलगी-तुरा ह्या लोककलेचं संवर्धन होण्याबरोबरच ह्या दोन्ही लोककलांना राजमान्यता मिळून सदर लोककला जोपासणाऱ्या लोककलावंतांना व कलापथक, संच, मंडळ यांना शासकीय योजनांचे लाभ तसेच अनुदान मिळावेत ह्या प्रमुख मागण्यांसह इतर विविध विषयांवर मुद्देसूद चर्चा करून शासनाच्या पुढील सांस्कृतिक धोरणात त्यावर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व आग्रही मागणी नमन लोककला संस्था व कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुबंई व समन्वय समितीच्या वतीने सदर चर्चा सत्रातून करण्यात आली.
पत्रकार तसेच शाहीर शाहिद खेरटकर, भिकाजी चोगले, अभयदादा सहस्त्रबुद्धे, सुधिर टाणकर,राष्ट्रपाल सावंत,प्रमोद घुमे, झराजी वीर असे जिह्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या लोककलावंतांनी सदर चर्चा सत्रात सक्रीय सहभाग घेऊन लोककलांबाबत विस्तृत माहिती देण्याबरोबरच लोककलावंतांच्या व्यथा सक्षमपणे मांडून सद्यस्थितीत धोरणात असलेले त्रुटींकडे लक्ष वेधले,त्याला लोककला समितीच्या सदस्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आगामी सांस्कृतिक धोरणात कोकणातील नमन, कलगी-तुरा,जलसा ह्या लोककलांची शासकीय पटलावर नोंद होण्याबाबत आम्ही निश्चित प्रयत्नशील राहू असे आश्वाशीत केले.
सदर सभेला नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र (भारत) रजि संस्थेचे महासचिव शाहिद खेरटकर, सदस्य- झराजी वीर, प्रशांत भेकरे, सदस्य/प्रसिध्दी प्रमुख- उदय दणदणे, संतोष घुमे,सुधीर टाणकर, कलगी- तुरा समाज उन्नती मंडळ समन्वय समितीचे अध्यक्ष अभयदादा सहस्त्रबुद्धे,तसेच मंगेश तांबे,चंद्रकांत मालप,वसंत भोजने, विलास नीवाते,अनिल जाधव,जयंत मिरगल मनोहर मिरगल, असे जिह्यातील अनेक लोककलावंत उपस्थित होते.