[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]
ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व मराठी माध्यमाच्या केंद्र शाळा या सेमी इंग्रजी माध्यमाच्या कराव्यात अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी उक्षी येथे आयोजित कार्यक्रमात केली.
उक्षी बनाचीवाडी पूर्ण प्राथमिक शाळेतील 1 ली ते 7 वी च्या सर्वच विद्यार्थ्यांना गाव विकास समिती मार्फत मोफत वह्या वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना सुहास खंडागळे यांनी म्हटले की कोकणात दोन प्रकारचे स्थलांतर वाढत आहे.एक स्थलांतर नोकरी निमित्ताने मुंबई, पुणे या दिशेने आणि दुसरे स्थलांतर हे ग्रामीण भागातून चांगल्या सोयीसुविधा,इंग्रजी माध्यमाचे शिक्षण यासाठी जिल्ह्यातील निमशहरी भागात होणारे.ग्रामीण भागातच चांगल्या सुविधा निर्माण केल्या ,मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शैक्षणिक उपाययोजना केल्या तर मराठी शाळांचे भविष्य चांगले आहे. एकीकडे खासगी इंग्रजी शाळांचे वर्चस्व वाढत असताना ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकांची मूल ज्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात तिथे सुद्धा या मुलांना किमान सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध करून द्यावे, त्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण द्यावे अशी भूमिका सुहास खंडागळे यांनी यावेळी मांडली.ग्रामीण भागात असणाऱ्या केंद्र शाळा या सेमी इंग्रजी माध्यमाच्या केल्यास त्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल असेही खंडागळे यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी, जिल्हा संघटक मनोज घुग, सदस्य महेंद्र घुग, महिला संघटना सदस्या उजमा मापारी-खान त्याच बरोबर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिश्चंद्र बंडबे, सदस्या अंकिता रावणंग, ग्रामस्थ, शिक्षक,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.