(रत्नागिरी / वैभव पवार)
महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील असलेल्या रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश साळवी यांची महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या एका अधिनियमानुसार निवड जाहीर करण्यात आली आहे.
प्रत्येक जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह विविध क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी जिल्हा नियोजन समितीचे गठन केले जाते. या समितीमध्ये जिल्ह्यातील नियोजनाचा अनुभव असलेल्या आणि सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्तींची निवड केली जाते. त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नुकतीच रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती तथा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश साळवी यांची निवड करण्यात आली आहे.
मागील अनेक वर्षे विविध पदांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रकाश साळवी यांनी नेतृत्वगुणांची चुणूक दाखवत आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला आहे. याच बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी प्रकाश साळवी यांची निवड केली आहे.
या पदावर निवड झाल्यानंतर प्रकाश साळवी यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने आणि नामदार उदय सामंत साहेब यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करून जो विश्वास दर्शवला आहे. तो विश्वास नक्कीच पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. विशेष म्हणजे या पदाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची नवी संधी मिळाली असून या पदाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेत लोकांची सेवा करणार आहे.
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी प्रकाश साळवी यांची निवड झाल्याने सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.