रत्नागिरी : येथील रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आणि चतुरंग प्रतिष्ठान यांनी सयुक्त विद्यमाने आजपर्यंत रत्नागिरीकरासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रत्नागिरीकरानीही या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद दिला. आता लॉकडाऊनच्या प्रदीर्घ कालावधी नंतर पुन्हा एकदा वाचनालयात अशाच एका विशेष मुलाखतीचा कार्यक्रम रंगणार आहे.
मुक्तसंध्याच्या निमित्ताने नगर वाचनालय आणि चतुरंग प्रतिष्ठान यांनी कला नाट्य रसिक रत्नागिरीकरासाठी नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या विनोदी, सहजसुंदर अशा स्वतःच्या वेगळ्या शैलीची छाप पाडलेल्या श्री. भरत जाधव याची मुलाखत आयोजित केली आहे. सध्या कोकणातच वास्तव्यास असणाऱ्या आणि श्री. भरत जाधव याच्या गाजलेल्या ऑल दि बेस्ट या नाटकातील सहकलाकार सौ. संपदा जोगळेकर-कुलकर्णी या संवादिकेच्या भूमिकेत असणार आहेत. कोरोनाच्या सगळ्या नियमांचे पालन करत रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात गुरुवार दि. 2 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी ठीक 5.30 वाजता हा कार्यक्रम सुरु होणार आहे.
आपले लाडके विनोदी अभिनेते श्री. भरत जाधव यांना जाणून घेण्यासाठी, त्यांच्याशी गप्पागोष्टीमय मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन चतुरंग प्रतिष्ठानचे श्री. विद्याधर निमकर व रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.