रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय कोरोना/लोकडाऊन कालखंडात शासकीय आदेशानुसार वाचक सेवेसाठी पूर्ण बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे रत्नागिरीतील वाचक सभासदांना पुस्तक दुर्भिक्षला सामोरं जावं लागले. कोरोनाचा प्रभाव कमी होताच वाचनालय सुरू करण्याची मुभा वाचनालयाला मिळावी म्हणून प्रयत्न सुरू होते त्यास यश येऊन वाचनालय सकाळी 9 ते सायंकाळी ४ या वेळेमध्ये वाचकांना पुस्तक देवाण-घेवाण करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसात लक्षणीय संख्येने मात्र गर्दी न करता सुरक्षिततेचे सर्व नियम सांभाळत दर्दी वाचकांनी या वाचन मंदिराला भेट दिली व आपली पुस्तके बदलून घेऊन परत वाचनाचा परिपाठ सुरू केला. गेले पाच महिने वाचनालय कोरोना महामारी मुळे बंद होती त्यामुळे वाचकांना त्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्ध होऊ मिळणे अवघड झाले होते. मात्र आता दुर्दैवी कालखंड संपला असून वाचकांनी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयातील पुस्तक संपदेचा भरभरून आस्वाद घेऊ शकतात.
प्रत्येक वर्गणीदार वाचकाला किमान दोन पुस्तके उपलब्ध
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या माध्यमातून प्रत्येक वर्गणीदार वाचक सभासदाला किमान दोन पुस्तके वर्गाप्रमाणे अधिक ची पुस्तके उपलब्ध होतात. नवीन वाचक वर्गाला वाचनालयाचे वर्गणीदार होऊन वाचनालयातील ग्रंथसंपदेचा आस्वाद घेत आपल्या बौद्धिक संग्रहालयात अधिकची माहिती अधिक से ज्ञान अर्जित करावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अँड दिपक पटवर्धन यांनी केले आहे. रत्नागिरीतील प्रत्येक शिक्षकांनी वाचनालयाचे वर्गणीदार होऊन वाचक व्हावे व आपल्या विद्यार्थ्यांना ही या पुरातन मात्र अद्ययावत वाचनालयाचे वाचक होण्यास उद्युक्त करावे . उपलब्ध 1लाख 7 हजार ग्रंथसंपदेचा आनंद लुटावा. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय हे 194 वर्षांची परंपरा लाभलेले महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय आहे.
अनेक दुर्मिळ ग्रंथ आणि विविधता पूर्ण वाङ्ममय प्रकारांची भरपूर पुस्तके
अनेक दुर्मिळ ग्रंथ, विविध प्रकारची वांग्मयीन पुस्तके, प्रवास वर्णने, ऐतिहासिक कथा, इंग्रजी नोवेल्स, नवनवीन कादंबऱ्या, अध्यात्मिक पुस्तके, अनेक संदर्भ ग्रंथ, जुने वेद, कवितासंग्रह, नाटकं, पु ल देशपांडे यांच्यासारख्या अनेक नामवंत साहित्यिकांची संपूर्ण साहित्य निर्मिती, अनेक आत्मचरित्र, ललितलेख अशा विविध वांग्मय प्रकारांनी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय परिपूर्ण झाले आहे. या वाचनालयातील ग्रंथसंपदे चा आस्वाद घेण्यासाठी दररोज या रत्नागिरी नगरीतील 80 ते 110 असे एकूण 2100 सभासद या वाचनालयाच्या ग्रंथ संपदेचे पाईक आहेत.
आर्थिक मदतीसाठी आवाहन
वाचनालयांची आर्थिक स्थिती सद्यस्थितीत खूप खालावलेली आहे. शासनाने अनुदानाच्या बाबत खूप सकारात्मकता ठेवलेली नाही.नवीन वर्षाचे व गत वर्षाचे अनुदान प्राप्त होणे बाकी आहे. गेले पाच महिने व त्या पूर्वीचे सात महिने आर्थिक ओढाटणीचे गेलेले आहेत. मात्र नियमित होणारे खर्च, ग्रंथांची देखबाल, साफ सुख, पावसाळी बाष्पयुक्त हवेपासून पुस्तकांचे संरक्षण, लाईट बिल, पाणी बिल, कर्मचाऱ्यांचा पगार, अनिवार्य दुरुस्त्या ही कामे एका बाजूने उत्पन्न बंद असतानासुद्धा वाचनालयाला करणे क्रमप्राप्त होते. वाचनालयाच्या व्यवस्थापक मंडळाने योग्य पद्धतीने नियोजन करून खर्चाचा हा डोंगर आज पर्यंत पेलला आहे. मात्र वाचनालयाला आर्थिक मदतीची प्रचंड आवश्यकता आहे . वाचनालयाला मोठ्या प्रमाणावर देणगी देऊन वाचन प्रेमींनी सहकार्य करावे. 194 वर्षाच्या या संस्थेला समाजाच्या सर्व स्तरातून आर्थिक मदत प्राप्त झाली तर ह्या वाचनालयाची आर्थिक चणचण सहजपणे दूर होईल व नवनवे उपक्रम घेऊन वाचनालय परत एकदा सुसंस्कृत रत्नागिरीचे वैभव म्हणून अग्रेसर होईल.
द्विशताब्दी वर्षां कडे वाटचाल करताना नवीन उद्दिष्टे
वाचनालयाच्या माध्यमातून अभ्यासिका सुरू करणे, तसेच स्वतंत्र संदर्भ ग्रंथ विभाग सुरू करणे, त्याच बरोबर छोटे सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम यासाठी कलाकारांना दालन उपलब्ध करून देणे. आणि शासनाची मदत घेत जुन्या दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन करणे आणि इमारतीचे नूतनीकरण करणे ही उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय दोनशे वर्षाच्या टप्प्याकडे मार्गस्थ होत आहे सर्वांचे सहकार्य वाचनालयाला अधिक ऊर्जितावस्थेत नेईल असा विश्वास वाटतो.
रत्नागिरीतील सर्व शिक्षक वर्ग, अधिकारीवर्ग, वकील , डॉक्टर मंडळी”, पेन्शनर्स, साहित्यक्षेत्रातील धुरिणी, व्यापारी वर्ग उद्योजक व्यावसायिक थोडक्यात समाजातील सर्व घटकांनी आणि प्रामुख्याने युवा वर्ग विद्यार्थी वर्ग यांनी वाचनालयाचे वर्गणीदार सभासद व्हावे व आवर्जून वाचनालयातील ग्रंथ संपदेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अँड. दिपक पटवर्धन यांनी केले आहे.