(रत्नागिरी)
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्य, जिल्हा ग्राहक निवारण आयोगाच्या अध्यक्षा, सदस्य अशा ११२ पदांकरीता परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील आठ प्रमुख शहरांमधील केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये रत्नागिरी जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्षपदी ॲड. इंदुमती मलुष्टे यांची निवड करण्यात आली आहे.
बहुपर्यायी, वर्णनात्मक लेखी परीक्षेला २०० गुण, मुलाखतीला ५० गुण ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने पदभरती प्रक्रिया राबविली होती. आयबीपीएसच्या तांत्रिक सहाय्याने राज्यातील आठ प्रमुख शहरांमधील केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांची मुलाखत मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधिश के. आर. श्रीराम यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत घेण्यात आली होती.
निवड समितीने दि. १५ सप्टेंबरला आपला निकाल जाहीर केला. रत्नागिरीतील ॲड इंदुमती श्रेयस मलुष्टे यांची जिल्हा आयोगाच्या अध्यक्षपदी, ॲड योगेश खाडीलकर यांची सदस्यपदी शिफारस करण्यात आली आहे. ॲड इंदुमती मलुष्टे सध्या वकिली व्यवसाय सांभाळत आहेत. बाल न्याय मंडळाच्या सदस्यपदाचा कार्यभार देखिल त्या सांभाळत आहेत. महाराष्ट्रातील १२३० उमेदवारांमधून ॲड इंदुमती मलुष्टे यांनी गुणवत्ता यादीत ३१ वा क्रमांक पटकावला. रत्नागिरी बाल असोसिएशनचे अध्यक्ष, सदस्य आदींनी ॲड इंदुमती मलुष्टे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.