(रत्नागिरी)
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अचानक वातावरणात बदल होत आज सकाळी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह रत्नागिरीत अवकाळीने हजेरी लावली. सकाळपासूनच काळोखाचे वातावरण होते. त्यानंतर ७.३० वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास १५ मिनिट पाऊस कोसळत होता. एमआयडीसी परिसरात थोड्या जास्त प्रमाणात पाऊस पडताना दिसून आला. गटारातून पाणी वाहत होते. तर मारुती मंदिर परिसराच्या खालच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. मात्र वर्षभर बोचक्यात असलेल्या छत्र्या व रेनकोट घेऊन आज नागरिक बाहेर पडलेले दिसले.
दरम्यान सकाळपासूनच काळोखाचे वातावरण असल्यामुळे पाऊस पडणार याची शक्यता असल्याने मॉर्निग वॉकला जाणाऱ्यांची संख्या आज खूपच कमी होती.
वातावरणात गारवा आल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकाना मात्र थोडासा दिलासा मिळाला आहे.