(वैभव पवार/ रत्नागिरी)
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा आणि संस्कार समिती रत्नागिरी यांचे विद्यमाने रत्नागिरी शहरातील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या निवासी बौद्धाचार्य शिबिराला आज शनिवार दिनांक 22 ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला. या शिबिरात बौद्धजन पंचायत समिती मुंबईचे अतिरिक्त चिटणीस रविंद्र पवार, बौध्दजन पंचायत समिती मुंबईच्या संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार, सचिव मनोहर मोरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिले असून त्यांचे मौलिक मार्गदर्शन शिबिरार्थी लाभणार आहे.
तसेच रत्नागिरी तालुका शाखेच्या संस्कार समितीचे बौद्धाचार्य व श्रामणेर उपस्थित होते. या शिबिरात एकूण ३६ शिबिरार्थी सहभागी झाले असून या सर्व शिबिरार्थींना बौद्ध धम्मातील गाथा व धार्मिक विधीसंदर्भात अतिशय मौलिक मार्गदर्शन बौद्धजन पंचायत समिती मुंबईचे अतिरिक्त चिटणीस रवींद्र पवार संस्कार समिती मुंबईचे अध्यक्ष मंगेश पवार, सचिव मनोहर मोरे यांचेमार्फत लाभणार आहे. सदर शिबिर शनिवार दिनांक २२ ते सोमवार दिनांक २४ ऑक्टोबर या तीन दिवशीय कालावधीत निवासी स्वरूपात घेण्यात येणार असून या शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींची लेखी परीक्षा घेऊन संबंधित शिबिरार्थींना बौद्धाचार्य सनदकार्ड व प्रमाणपत्र वितरित केली जाणार असल्याची माहिती रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समितीच्या आयोजकांकडून देण्यात आली. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उपसमित्यांचे पदाधिकारी आणि बौद्धाचार्य, श्रामणेर मेहनत घेत आहेत.