रत्नागिरी शहरातील सडामिऱ्या येथील दोघांना शहर पोलिसांकडून रत्नागिरी महसुली उपविभागाच्या हद्दीबाहेर 6 महिने कालावधी करता हद्दपार करण्यात आले. रुपेश कमलाकर सावंत (40) आणि राजेश कमलाकर सावंत (40, दोन्ही रा.सडामिऱ्या, रत्नागिरी) अशी हद्दपार करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांची नावे आहेत. हे दोघेही सतत एकत्रित येउन गुन्हे करत असल्याची बाब शहर पोलिसांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे त्यांनी या दोघांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिस अधिक्षकांकडे पाठवला होता.
याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशीअंती दोघांना हद्दपार करण्याची शिफारस केली होती. यानंतर पोलिस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांनी या प्रकरणी स्वतःसुनावणी घेउन 27 एप्रिल 2021 रोजी या दोन्ही गुन्हेगारांना रत्नागिरी महसुली उपविभागाच्या हद्दीबाहेर 6 महिने कालावधी साठी हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर रविवार 9 मे 2021 रोजी पोलिस अधिक्षक मोहित कुमार गर्ग यांना या दोघांबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी कारवाई करण्याचे आदेश व मार्गदर्शन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला केले होते. त्यानूसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार संदीप कोळंबेकर, शांताराम झोरे, सुभाष भागणे, संजय जाधव, पोलिस नाईक विजय आंबेकर, बाळु पालकर, उत्तम सासवे, अमोल भोसले यांनी रविवार 9 मे रोजी रात्री सडामिऱ्या येथे या दोन्ही गुन्हेगारांचा शोध घेउन त्यांना ताब्यात घेतले.
या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात कलम 141 महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवार 10 मे रोजी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रणजित जाधव करत आहेत.