( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी शहरातील एका महिलेच्या बँक खात्याला लिंक असलेला मोबाईल नंबरचा गैरवापर करून क्रेडिट कार्ड द्वारे 9 लाखांचा गंडा घालणाऱ्या एका भामट्याला रत्नागिरी शहर पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे. गोपाळ भुजंगराव जाधव (28, लातूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे फेडरल बँकेच्या महिला खातेदाराच्या बँक खात्याला लिंक असलेला मोबाईल काही वर्षांपूर्वी बंद होता हा नंबर जाधव याला मिळाला. खातेधारकाच्या नावे असलेला क्रेडिट कार्डचा पत्ता त्याने या मोबाईलच्या लिंक द्वारे बदलला. लातूर येथील अशोक हॉटेल अमृता ट्रॅव्हल्स लातूर ४१३५१२ या पत्त्यावर हे क्रेडिट कार्ड त्याला प्राप्त झाले. या बँक खात्याचे मूळ खातेदार ही चिंचखरी येथील महिला आहे. मात्र त्यांच्या नावाचे क्रेडिट कार्ड वरून लातूर येथून हा तरुण वेळोवेळी पैसे काढत होता. क्रेडिट कार्ड द्वारे त्याने 8 लाख 85 हजार एवढी रक्कम काढून बँकेची ही फसवणूक केली. मार्च ते जून 2022 या कालावधीमध्ये हा गुन्हा घडला होता. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर फेडरल बँकेच्या मॅनेजर यांनी लातूर येथील अमृता ट्रॅव्हल्स मधील अज्ञातविरोधात पोलीस साधकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्री हलवत तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताचे नाव व पत्ता यांची माहिती मिळवली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, संकेत महाडिक, रमिझ शेख, अमित पालवे यांचे पथक लातूरला रवाना झाले. या पथकाने गोपाळ जाधव या तरुणाला शोधून अटक केली. त्याला रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.