( दापोली )
भटके विमुक्त जाती जमातीचे आयोगाचे माजी अध्यक्ष भिकूजी उर्फ दादा इदाते यांना केंद्र सरकारने पद्मश्री जाहीर केला आहे. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराने संपूर्ण दापोलीवासीयांची शान उंचावली आहे.
दादा इदाते यांनी भटके विमुक्त जाती जमातीसाठी केलेलं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. महाराष्ट्र बरोबरच संपूर्ण देशातील या दुर्लक्षित घटकाला कागदावर उतरवण्याचे काम दादा इदाते यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे. दादा इदाते हे दापोलीतील जालगाव येथे राहतात. त्यांना पद्मश्री जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी दापोली शरद पवार आणि तहसीलदार वैशाली पाटील यांनी नुकतेच पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या दादा इदातेंचं अभिनंदन केले. जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून पद्मश्री दादा इदाते यांचे अभिनंदन केले. आज गुरुवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दादा इदाते यांचा गौरव करण्यात आला.