(रत्नागिरी)
शहरातील जेलनाका ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील बीएसएनएल कार्यालयाची ३ लाख २१ हजार ३८१ रुपये किमतीची भूमिगत टेलिफोन केबल चोरल्याचा प्रकार उघडकीला आला होता. या केबल चोरीप्रकरणी तीन संशयित चोरट्यांना शहर पोलिसांनी शनिवारी (१७ जून) अटक केली आहे.
या प्रकरणी नंदकुमार केरू कांबळे (५०, रा. सिद्धीविनायक नगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली होती. अब्दुल मदारसाब मुल्ला (४१, रा. खालचा फगरवठार, मूळ रा. काटा मार्केट- विजापूर, कर्नाटक), मन्नू उर्फ रामस्वरूप पटेल (४५, रा. रत्नागिरी, मळ रा. ग्राम भाटीया ता मैजीयाद जि. सतना, मध्य प्रदेश), युवराज बाळू गोसावी (रा. विक्रमनगर, कागल, ता. जि. कोल्हापूर, सध्या रा. खडपेवठार झोपडपट्टी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना १४ ते १५ जून रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली होती.
पोलिसांनी अटक केलेल्या तिघांनी जेल नाका ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या परिसरातील १,०३,८०० रुपयांची २० मीटर लांब २४०० पेअरची केबल १२९.७५० रुपये किमतीची २५ मीटर लांबीची काळ्या रंगाची १२०० पेअरची केबल, ८६,९२५ रुपये किमतीची सुमारे ८० मीटर लांबीची काळ्या रंगाची ४०० पेअरची केबल, तसेच ९०६ रुपये किमतीची ५ मीटर लांबीची काळ्या रंगाची ५० पेअरची केबल अशी सुमारे ३ लाख २१ हजार ३२१ रुपयांची भूमिगत टेलिफोन केबल चोरली होती.
या चोरीचा तपास पोलिस उपनिरीक्षक बी. डी. वनवे करत होते. तपासात संशयित मुल्ला याच्याकडून चोरी केलेला काही मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात केला आहे. उर्वरित मुद्देमाल त्याने संशयित युवराज गोसावी याला विकल्याचे तो सांगत आहे. मात्र, गोसावीने हा मुद्देमाल कोल्हापूर येथे विकला असून, तो कोणाला दिला याबद्दल अद्याप पोलिसांना माहिती दिलेली नाही.