( रत्नागिरी /प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे रत्नागिरी जिल्हतील कार्यकर्ते, पदाधिकारी दिल्ली येथे आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. देशभरातील जवळपास १० लाख कर्मचारी, १ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या “पेन्शन शंखनाद रॅली” च्या माध्यमातून आपली कर्मचारी एकतेची ताकद केंद्र सरकारला दाखवणार आहेत.
या राष्ट्रीय पेन्शन आंदोलनासाठी देशभरातील कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. देशभरात होत असलेले शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण व शेअर बाजारावर आधारित असलेली नवीन पेन्शन योजना हटवून पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना बहाल करणे व शासकीय नोकऱ्यांचे बाजारीकरण थांबवणे यासाठी हे राष्ट्रव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या पेन्शन शंखनाद आंदोलनासाठी देशभरातील जवळपास १० लाखांपेक्षा ही जास्त कर्मचारी येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील २५ हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
आतापर्यंत साडे तीन लाख रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्यात आल्याचे समजते आहे.तसेच उर्वरित कर्मचारी खाजगी वाहनाने,विमानाने दिल्ली येथे ३० सप्टेंबर रोजीच दाखल होणार आहेत.आंदोलनाची तयारी म्हणून एकच मिशन,जुनी पेन्शन!,पुरानी पेन्शन योजना बहाल करो!,शासकीय नोकरीचे खाजगीकरण हटवा!,पेन्शन शंखनाद आंदोलन लिहलेले टी शर्ट,टोप्या बनवण्यात आले आहेत. मागणी संदर्भात असे विविध हँड बॅनर ही बनवण्यात आले आहेत.