रत्नागिरी – सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आशादीप मतिमंद मुलांचे पुनर्वसन केंद्र याला विविध प्रकारची मदत करण्यात आली आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजित पद्धतीने आणि सर्व सुरक्षा निकष पाळून ही मदत करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष सीएमए उदय बोडस यांच्या मातोश्री श्रीमती सुमित्रा बोडस यांना मे महिन्यात ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी कडक निर्बंध असल्याने कोणताही धार्मिक विधी न करता त्याचा खर्च मदत म्हणून आशादीपला देण्यात आला. त्याचा धनादेश ट्रस्टचे अध्यक्ष सीएमए उदय बोडस यांनी आशादीपचे अध्यक्ष दिलीप रेडकर याना सुपूर्द केला. तसेच वाढदिवसाचा खाऊ म्हणून १०० चाॅकलेट देण्यात आली.
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त यशराज बोडस यानी आशादीप केंद्रातील सदस्यांना खाऊसाठी 24 बिस्कीट पुडे आणि शर्ट- टी शर्ट- बर्म्युडा पॅण्ट, साडी व काॅटनचे पंचे असा 10 कपड्यांचा सेट परावलंबी प्रौढ मतिमंदांसाठी दिला. लाॅकडाऊनचा परिणाम म्हणून आलेल्या मंदीमुळे मदतीचा ओघ कमी झाला असताना बोडस चॅरिटेबल ट्रस्टची ही विविध प्रकारची मदत आम्हाला हुरूप देणारी आहे असे उद्गार दिलीप रेडकर यांनी यावेळी काढले. याप्रसंगी आशादीपच्या व्यवस्थापिका सौ.स्मिता जडे उपस्थित होत्या.