( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त व सहाय्यक औषध नियंत्रक नितीन देवरे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील फार्मा रत्न युनिव्हर्स २०२२ हा पुरस्कार नुकताच दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. त्यांच्या औषध क्षेत्रातील आता पर्यंत केलेल्या महत्त्वाच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.या पुरस्कारासाठी ४० देशातील औषध क्षेत्रातील मान्यवर संशोधक व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना फार्मा रत्न या दिल्लीस्थित राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्यावतीने सांगण्यात आले की, दरवर्षी औषध क्षेत्रातील जागतिक स्तरावर विशेष कार्य करणार्या व्यक्तीला पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या वर्षी जगातील सर्व जनतेला कोणत्याही आजाराच्या साथी मध्ये औषध कमी पडू नये यासाठी नवीन संशोधन व उत्पादन वाढविण्यात येऊन व्यावसायिक नात्याबरोबर सेवा करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे त्यादृष्टीने काम करणार आहोत असे स्पष्ट केले.
रत्नागिरी जिल्ह्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन देवरे हे औषध निरीक्षक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष असून औषध क्षेत्रातील सेमिनार मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय मासिकात शोध निबंध यामाध्यमातून कार्य करीत आहेत. या कार्यक्रमाला सर्व राज्यांच्या औषध उत्पादक असोसिएशन, भारतीय औषध परिषद, महाराष्ट्र राज्य औषध नियंत्रक उपस्थित होते.