रत्नागिरी जिल्ह्यात वाढणारे कोविडचे रुग्ण, त्यांना योग्य वेळेत उपचार मिळण्याकरिता रत्नागिरीतील मिरजोळे, एमआयडीसी येथे एम. के. उद्योग समूहाचे संचालक आणि उद्योजक अनुप सुर्वे यांनी पुढाकार घेतला आहे. सुर्वे यांच्या सुमा कंपनीच्या जागेत कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. लवकरच ते रत्नागिरीकरांच्या सेवेत रुजू होईल. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केलेल्या आवाहनाला सुर्वे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने देशभर कहर माजविला असताना शासन आणि प्रशासन त्यांचे योगदान देत आहे. मात्र लोकसंख्या आणि बाधित रुग्णाची वाढती संख्या यामुळे प्रशासनाला उद्योजक, सामाजिक संस्था यांचे सहकार्य आवश्यक बनले आहे. रत्नागिरीतही वाढती रुग्णसंख्या पहात शासकीय सुविधांसोबत जनतेच्या सहकार्याची गरज पडत आहे. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उद्योजक, सामाजिक संस्थांना आवाहन केले होते. त्यांना प्रतिसाद देत सुर्वे यांनी हे कोविड सेंटर उभारले आहे.
हे कोविड केअर सेंटर सध्या 70 बेडचे आहे. या सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये डेडिकेटेड कोव्हिड केअर सेंटर म्हणूनही सुविधा मिळणार आहे. ज्यात आवश्यकतेनुसार ऑक्सिजन बेडस आणि अन्य आवश्यक सुविधा असणार आहेत.
अनुप सुर्वे यांनी याआधीही कोकण आणि रत्नागिरीसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. मात्र कायम प्रसिद्धीपासून दूर रहात सामाजिक बांधिलकी जपली आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक उद्योजकांसमोर चांगला आदर्श ठेवला आहे. पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी अनुप सुर्वे यांचे कौतुक करत बाकी उद्योजकांनीही अशा प्रकारचे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
हे कोविड केअर सेंटर प्रत्यक्षात येण्यासाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे यांनी महत्वाची भूमिका बजावली. पोलीस प्रशासन आणि उद्योजक यांचा सुसंवाद साधून हे कोविड केअर सेंटर प्रत्यक्षात येण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्याबाबत आवश्यक गोष्टींची पूर्तता केली.
महेश गर्दे यांनी यासोबतच कोरोना योद्ध्याची भूमिका चोख बजावत शासकीय कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा करीत आहेत. रुग्णांना समुपदेशन, बेडची व्यवस्था करणे, आपत्कालीन मदत यासह पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र म्हणूनही उत्तम कामगिरी केली आहे. प्रशासन आणि जनता यामधील दुवा हीच महेश गर्दे यांची ओळख आहे. असे गौरवोद्गार काढत पोलीस प्रशासनाने गर्दे यांचेही कौतुक केले आहे. या सेंटरमुळे पोलीस प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य यंत्रणेमध्ये सामाजिक काम करणार्या व्यक्ती यासंबंधीत येणार्या रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.