( पुणे )
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदांतील रखडलेली पदभरती तत्काळ करावी, अशी सूचना ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे. या संबंधी उपसचिव विजय चांदेरे यांनी नुकतेच पत्रक प्रसिद्ध केले आहे.
जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया मागील चार वर्षांपासून विविध कारणाने रखडल्या आहेत. त्यात राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार पदांच्या भरतीची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात कोणतीच हालचाल होत नसल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मिडीयानेही या संबंधी बातमी वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या आहेत. या भरतीच्या अनुषंगाने सुमारे १३ लाख सुशिक्षित बेरोजगारांकडून परीक्षा शुल्क म्हणून गोळा केलेली २५ कोटी ८७ लाख रुपयांची रक्कमे संदर्भातले वृत्तही प्रसिद्ध झाले होते.
मागील साडेतीन वर्षांत विविध कारणाने जिल्हा परिषदेतील पदभरती वादग्रस्त ठरली आहे. यंदा पदभरतीची घोषणा करतानाच सर्वसाधारण वेळापत्रक घोषित करण्यात आले होते. मात्र, या वेळापत्रकानुसार कोणतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचे वय दिवसेंदिवस वाढत असून, भरती होत नसल्याने तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य आले आहे. रखडलेली ही भरती तत्काळ करण्यात यावी, अशा मागण्या विद्यार्थी संघटना करत आहे. पदभरतीच्या वाढत्या असंतोषाची दखल ग्रामविकास विभागाच्या आदेशात घेण्यात आली आहे.