(मानसिक संतुलन भाग १६)
देव ही एक अशी संकल्पना आहे की सामान्य माणसाला तिचा मोठा आधार वाटतो. त्याच्यावर भार टाकून अनेक जण निश्चिंत होतात. जीवनात आलेली निराशा अनेक संतांनी भक्ती करून नाहीशी केलेली उदाहरणे आपल्याला दिसतात. त्यांच्याही जीवनात असे अनेक दुःखी प्रसंग आले होते. काही प्रसंगी त्यांनाही वाटले की आपण आपले जीवन संपवावे. परंतु त्या सर्वांवर त्यांनी मात केली. भक्तीने त्यांचे जीवन बदलून गेले. खरेच भक्तिमार्ग सामान्य लोकांच्या जीवनात संजीवनी आणते. स्वामी विवेकानंदांनीही संसारी माणसाला भक्तिमार्ग योग्य असल्याचे म्हटले आहे. अलीकडच्या पिढीमध्ये अशा भक्तीचे प्रमाण कमी होत चाललेले दिसते. भक्तीच्या नावाखाली मानसिक तणाव वाढवणारा उन्माद मात्र फोफावलेला दिसतो.
सामान्य गृहस्थीचे जीवनच मुळी अनेक समस्यांनी भरलेले असते. ह्या समस्या त्याने स्वतःच निर्माण केलेल्या असतात. परंतु अज्ञानपणामुळे त्याला त्या समजत नाहीत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक कामात तो व्यस्त असतो. अर्थात त्यात स्वतःला फार कमी स्थान असते. त्याला आपल्या घराची काळजी, मुलांची काळजी, नातीगोती, शेती, नोकरी अशा ना ना काळज्यांचा ससेमिरा त्याच्या मागे त्याने ओढवून घेतलेला असतो. ओढवून घेतलेला असतो असे का म्हणावे? कारण तो स्वतःला या सर्वांसाठी जबाबदार मानीत असतो. मी नसेन तर काय होईल? किंवा ही कामे कोण करील? माझ्या मागे माझ्या बायको व मुलांचे कसे होईल? अशा भ्रमात तो जगत असतो. अशा ओढवून घेतलेल्या जबाबदारीने जगत असताना अचानक त्याच्या भ्रमाचा हा भोपळा फुटतो.
* ज्याला आपले समजलो त्याने परकेपणा दाखवला.
* ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच धोका दिला.
* इतकेच काय ज्या देहाला सर्वस्व मानून त्यास नटवले फटवले, ज्याच्यासाठी सुखसुविधा निर्माण केल्या ते शरीरच जीर्ण (वृद्ध) झाले. अनेक रोगांनी ग्रस्त झाले.
त्यामुळे अंती निराशा येते. वृध्दत्व नैसर्गिक आहे. परंतु जीवनात काही असेही टप्पे येतात की ही निराशा लवकरच गाठते. त्याची कारणे खालील प्रमाणे असू असतात…
• निर्णय चुकले.
• आर्थिक समस्या निर्माण झाली.
• अपघाताला सामोरे जावे लागले.
• कुणी विश्वासघात केला.
• नैसर्गिक आपत्ती आली.
• आजारपण आले.
• व्यसनात सापडलो.
इत्यादी एखाद्या किंवा अनेक कारणांमुळे जीवनाच्या मध्यावरच निराशा गाठते. कुठे चुकते आपले ? मागील लेखांतून याबाबतची सविस्तर कारणे आपण पाहिली. मन मोठे विचित्र आहे. ते तारते आणि मारतेही! त्याच्यावर जर आपले नियंत्रण नसेल तर ते अनेक समस्या निर्माण करते. त्यासाठी आपल्या दिनचर्येवर आपले नियंत्रण हवे. आदर्श दिनचर्या कशाला म्हणावी? ज्या दिनचर्येत चार पुरुषार्थ साधले जातात ती योग्य दिनचर्या! धर्म, अर्थ काम आणि मोक्ष हे ते चार पुरुषार्थ.
सकाळी उठताच पहिले कर्तव्य आपल्या स्वत:प्रती असावे. स्वतःला ठीकठाक केल्याशिवाय कामाला हात घालू नये. किंवा इतरांच्या सेवेला लागू नये.
• सकाळी जाग येताच अंथूरणावर उठून बसावे.
• झोप अपूर्ण असेल तर पेंग जाईपर्यंत भिंतीला टेकून बसावे.
• त्यानंतर आळोखेपिळोखे द्यावे. कुठे काही दुखत तर नाही ना, तपासावे. दुखत असेल तर कोणती काळजी घ्यावी लागेल याचा विचार करावा.
• मानसिक स्थितीकडे लक्ष टाकावे. डोक्यात काही राग, चिंता, भय इत्यादी काही आहे का? याची चाचपणी करावी. असेल तर योगातील काही मनोकायिक तंत्रांचा उपयोग करावा. व त्या भावनेला शांत करावे. भावनेचा वेग तीव्र असेल तर कोणती काळजी घ्यावी लागेल याचा विचार करून मग अंथरूण सोडावे.
• अंथरूण सोडल्यावर प्रथम उघड्या डोळ्यांवर पाण्याचा सपकारा मारावा. त्यामुळे चेहऱ्यावर रक्ताभिसरण वेगाने चालू होते. व डोळ्यांचे आरोग्यही सुधारते.
• शक्य असेल तर सकाळी स्नान करून योगाभ्यास करावा. महिलांनी जरा लवकर उठून आपल्या स्वतःसाठी असा वेळ दिल्यास त्यांचे आरोग्य नीट राहील. असे न करू तर पूर्ण दिवसात इतरांना आपल्यामुळे त्रास होतोच परंतु आपल्यालाही त्रास होतो.
• त्यानंतर आपल्या दैनिक कामांना सुरवात होते. पुरुष वर्ग किंवा अलीकडे महिलाही बाहेर कामाला जातात. हा दुसरा पुरुषार्थ “अर्थ” होय. आपण नेहमी स्वावलंबी असले पाहिजे. आपल्याला आवश्यक तेवढे धन आपण मिळवलेच पाहिजे. परावलंबी असू नये. याचकाचे जीवन अतिशय वाईट.
• दिवसातील काही वेळ ( किमान १ तास) आपण आपल्या वयक्तिक आनंदासाठी ठेवावा. यामध्ये, देवपूजा करणे चालायला जाणे, खेळ खेळणे, छंद जोपासणे, अशा प्रकारे मनास प्रसन्न करणारे व शिथिल करणारा कोणताही उपक्रम “काम” ह्या पुरुषार्थात मोडतो. अलीकडे यासाठी कुणी वेळच देत नाहीत. त्यामुळे तणाव वाढत चालला आहे.
• दिवसभरात अशा अनेक कार्यात व्यस्त असताना स्वतःकडे, स्वतःच्या आत्मउन्नतिकडे आपले लक्ष असेल तर चौथा पुरुषार्थ “मोक्ष” साधला जातो. यामध्ये..मंदिरात जाणे, समाजसेवा करणे, सामाजिक कार्यात भाग घेणे. इत्यादींचा समावेश होतो. रात्री झोपताना ह्या चारही पुरुषार्थांचा आढावा घ्यावा. व दिवसभरातील बरी वाईट सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करावीत. त्यामुळे झोप चांगली लागते.
आपल्या कर्तव्यांवर अशाप्रकारे दटून न राहता भावनेच्या आहारी जाऊन काही कृत्य केल्यास तणाव निर्माण होतो. निसर्ग नियमानुसार चालल्यास व निसर्गाचे नियम पाळल्यास तणावरहित जीवन सहज जगता येते. जीवन जगणे ही एक कला आहे. आणि योग हे जीवन कसे जगावे याचे चांगले ज्ञान देणारे शास्त्र आहे. म्हणून योगास जीवन जगण्याचा एक सर्वोत्तम मार्ग मानतात. पतंजलींनी त्यासाठी अष्टांग योग सांगितला आहे. योग म्हटला की तो साधू सन्यासांचा मार्ग असे काहींना वाटते. योग म्हणजे निराश ,रुक्ष असाही काहींचा समाज असतो. परंतु वास्तवात तसे नाही.एखादा योगी जीवनाचा जो आनंद घेतो त्यातील एक दोन टक्केही आनंद सामान्य माणसाच्या वाट्याला येत नाही. कारण त्याचे निम्मे अधिक आयुष्य आजारपणातच जाते.
योग इन्स्टिट्युट सांताक्रुझ मुंबई ह्या योगाश्रमाचे संस्थापक श्री योगेंद्रजींनी योगासारखा कठीण ज्ञानमार्ग १९१८ साली सर्वसामान्यांसाठी खुला केला. आणि आनंद विहार आश्रम मंडणगड चे संस्थापक श्री दिनेश पेडणेकर यांनी २००१ साली तो कोकणातील सामान्य शेतकऱ्यासाठी आणखी सुलभ केला. योग हा कोणता पंथ, संप्रदाय किंवा धर्म नाही. ती एक उत्तम जीवन कसे जगावे हे सांगणारी ज्ञान प्रणाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात तळेघर नावाचे लहानसे गाव आहे. या गावातील काही महिला नियमित योगासने करतात. या गावात वानप्रस्थाश्रम म्हणून वृद्धांचा एक योग प्रकल्प चालतो. अगदी सामान्य शेतकरी महिला या प्रकल्पात आहेत. त्यांनी योग (ज्ञानमार्ग) अंगिकारला आहे. खूप खूष आहेत. अनेक समस्या असूनही त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नाही. जीवनाचे सार त्यांना समजले आहे. ८० वर्षाची एक आजी अजूनही ठणठणीत आहे. तिचे अजून काहीही दुःखत नाही. चेहऱ्यावर तेज आहे. नित्यनेमाने योगासने करते. योगामधले यम नियम पाळते. लहान मोठ्या कारणांनी निराश होणाऱ्या आजच्या पिढी समोर ती एक आदर्श आहे.
– दिनेश पेडणेकर, योग शिक्षक (मंडणगड)
मोबाईल 9420167413