(मेलबर्न)
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने 2007 साली पहिल्याच टी20 वर्ल्ड कपमध्ये 12 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात युवीनं स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर सर्वात कमी बॉलमध्ये मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या स्टॉयनिसने अर्धशतक झळकावलं.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी सुपर 12 फेरीच्या दुसऱ्या सामन्यात अरोन फिंचच्या ऑस्ट्रेलियानं दणदणीत विजय साजरा केला. आशिया चषक विजेत्या श्रीलंकेला कांगारुंनी 7 विकेट्सनी मात दिली. पण ऑस्ट्रेलियाच्या या विजयात सर्वात जास्त भाव खाऊन गेला तो ऑल राऊंडर मार्कस स्टॉयनिस. आज तर स्टॉयनिसला युवराज सिंगच्या पंक्तीत मानाचं स्थान मिळालं. त्याच्या वेगवान अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाला यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय साजरा करता आला.
अवघ्या 17 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. 4 फोर आणि 6 सिक्ससह नाबाद 59 धावा फटकावल्या. आता आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम स्टॉयनिसच्या नावावर जमा झाला आहे.
टी 20 वर्ल्ड कपमध्ये फास्टेस्ट हाफ सेंच्युरी
▪️ युवराज सिंग भारत – 12 बॉल (2007) वि. इंग्लंड
▪️ स्टीफन मायबर्ग नेदरलँड – 17 बॉल (2014) वि. आयर्लंड
▪️ मार्कस स्टॉयनिस ऑस्ट्रेलिया – 17 बॉल (2022) वि. श्रीलंका
▪️ ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलिया – 18 बॉल (2014) वि. पाकिस्तान
▪️ लोकेश राहुल भारत – 18 बॉल (2022) वि. स्कॉटलंड