(मुंबई)
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडून अजित पवार यांच्यासह ९ आमदार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामिल झाले आणि त्यांनी थेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेला आज १०० दिवस पूर्ण झाले. या निमित्ताने त्यांनी जनतेला उद्देशून आज एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी स्वत:चा उल्लेख राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला. यात त्यांनी महायुती सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडताना लोककल्याणासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळला आणि यशवंतराव चव्हाण यांचे लोककल्याणाचे धोरण पुढे सुरू ठेवणार असल्याचे आवर्जून सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श, फुले शाहू- आंबेडकरांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोककल्याणाचे धोरण यांचा वारसा जपला आहे. माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील पुढील काळात हीच परंपरा कायम जपणार आहे. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला निर्णय घ्यावे लागतात. अशीच भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २ जुलै २०२३ रोजी महायुती सरकारमध्ये सामील झाला. प्रत्येक काळ हा वेगळा असतो. त्या-त्या काळानुसार येणा-या आव्हानांचा सामना करत लोकांच्या कल्याणासाठी लोकप्रतिनिधींना काम करावे लागते. येत्या काळात राष्ट्रवादी वर्ष काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील शेतकरी, युवक, महिला आणि विविध समाजघटकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या भूमिकेतून राज्य सरकारमध्ये कार्यरत असेल, अशी ग्वाही त्यांनी पत्रातून दिली.
१०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण असे म्हणत शरद पवार गटाने अजित पवार गटाला जोरदार प्रत्युत्तर दिले. १०० दिवस छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे, १०० दिवस मायबाप शेतक-यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचे, यासह शेलक्या भाषेत हल्लाबोल केला. १०० दिवसांचे कर्तृत्व सांगावे लागणे, यातच तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख्ख दिसून येत आहे, अशी टीकाही त्यांनी ट्वीटद्वारे केली.