(मुंबई)
पारंपारिक, पूर्वांपार आडाखे आणि भारतीय पंचांगानुसार सूर्य स्वाती नक्षत्रात असेपर्यंत पाऊस राहतो. चित्रा आणि स्वाती नक्षत्रांत माघारीचा पाऊस पडू शकतो, अशी समजूत आहे. यंदाच्या वर्षी येत्या २४ ऑक्टोबर २०२२ रोजी सूर्याचा स्वाती नक्षत्रात प्रवेश होणार आहे. त्यामुळे येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून मोसमी पाऊस पूर्णपणे माघारी परतल्याचे हवामान खात्याकडूनही अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही.
मृग ते हस्त ही नक्षत्रे पावसाची नक्षत्रे म्हणून ओळखली जातात. सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झाला की पावसाला सुरुवात होते असे मानले जाते. यंदाच्या वर्षी ८ जून या दिवशी सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला. सूर्य स्वाती नक्षत्रात असेपर्यंत पाऊस राहतो अशी पारंपारिक समजूत आहे. पर्जन्य नक्षत्रे आणि त्याचे वाहन यावरून पावसाचा अंदाज बांधण्याची पूर्वापार प्रथा आपल्याकडे आहे. हत्ती, मोर घोडा, उंदीर, कोल्हा, म्हैस, बेडुक, मेंढा, गाढव ही पावसाच्या नक्षत्रांची वाहने आहेत.
बेडूक, म्हैस, हत्ती हे वाहन असेल तर भरपूर पाऊस पडतो. मोर, गाढव आणि उंदीर हे वाहन असेल तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो. यंदा १० ऑक्टोबर या दिवशी सूर्याचा चित्रा नक्षत्रात प्रवेश झाला असून वाहन उंदीर आहे आणि येत्या २४ ऑक्टोबर रोजी सूर्याचा स्वाती नक्षत्रात प्रवेश होणार असून वाहन गाढव आहे.