(संगमेश्वर / प्रतिनिधी )
निवृत्त बॅंक कर्मचारी आणि मौजे असुर्डे येथील प्रतिष्ठीत ग्रामस्थ अभय यशवंत पाध्ये ( ६४ ) यांचे सांगली येथील इस्पितळात औषधोपचार सुरु असताना शुक्रवार २८ जुलै रोजी रात्री आठ वाजता दु:खद निधन झाले . त्यांच्या अकाली निधनामुळे मौजे असुर्डे गावावर शोककळा पसरली आहे .
अभय यशवंत पाध्ये हे बॅंक कर्मचारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काही वर्षे मुंबई येथे एका बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम पाहिले . मुंबईहून गावी आल्यानंतर गावातील विविध सामाजिक कार्यात भाग घेऊन गावचे पौराहित्य देखील सांभाळले . अभय यांना गायनाची आवड असल्याने विविध कार्यक्रमात ते हौशी गायक म्हणून गायन करत असत . विठ्ठल भक्त असल्याने त्यांनी घरानजिक असणाऱ्या पिढीजात विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात वडिल यशवंत पाध्ये यांच्या सहकार्याने प्रमुख भूमिका पार पाडली होती . येथील एकादशीचा उत्सव प्रसिध्द समजला जातो . एक मितभाषी व्यक्तिमत्त्व म्हणून अभय पाध्ये यांची जनमानसात ओळख होती .
वीस दिवसांपूर्वी अभय पाध्ये यांना ताप येवू लागल्याने तसेच अशक्तपणा जाणवू लागल्याने ते सांगलीस्थित मुलगा अमित याच्याकडे विश्रांती आणि अधिक उपचार करुन घेण्यासाठी गेले होते . सहा दिवसांपूर्वी त्यांना श्वास घ्यायला त्रास होवू लागल्याने त्यांना अधिक उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते . उपचार सुरु असतानाच शुक्रवारी त्यांची प्रकृती खालावली आणि रात्री ८ वा . त्यांची प्राणज्योत मालवली . आज सांगली येथील स्मशानभूमीत दुपारी १ : ३० वा . त्यांच्यावर दु:खद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी मौजे असुर्डे , कसबा – संगमेश्वर , राजापूर , चिपळूण , रत्नागिरी , सांगली आदि ठिकाणचे ग्रामस्थ उपस्थित होते . अभय पाध्ये यांच्या पश्चात वडिल यशवंत पाध्ये (९४) , पत्नी , दोन मुलगे , सुना , नातवंडे असा परिवार आहे .