(रत्नागिरी)
आजकाल तरुणाई मोबाईलच्या विळख्यात सापडली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक धक्कादायक प्रकार घडत असतात. असाच एक दुर्दैवी प्रकार रत्नागिरीत घडला आहे. सतत माेबाईलचा वापर करत असल्याने आई ओरडल्याने शहरातील मुरुगवाडा येथील तरुणीने समुद्रात उडी घेत आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी २१ मे च्या रात्री ८:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. कीर्ती जयेश बोरकर (१९, रा. झाडगाव – मुरुगवाडा मिऱ्यारोड, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
सोमवारी रात्री कीर्ती घरात कोठेही न दिसल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता ती पांढरा समुद्राच्या येथे पाण्यात आढळून आली. नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी तिला पाण्याबाहेर काढले. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून रात्री ११:३० वाजता मृत घोषित केले.
दरम्यान, सतत मोबाईलचा वापर करत असल्याच्या कारणातून तिला आई ओरडली होती. या रागातून तिने रात्री पांढरा समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात २२ मे राेजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.